नामकरण

आपली संस्कृती फार महान
याचा आपल्याला भारी अभिमान
इतरांचही काही चांगल असतं
याची मात्र ठेवावी जाण

नको असलं आपल्याला जरी
पाश्चिमात्यांचं अंधानुकरण
तरी चांगलं असेल ते उचलावं
याचं जरूर असाव भान

"यांचं नेहमीच नाटकी वागणं
तोंडावर गोडगोड मागे दूषणं"
अवघड आहे कायम हसून बोलणं
सगळ्यांना आपल्यात सामावून घेणं

शाळेत नाही शिकवत चारचौघात वागणं
वा दुसर्‍यांच्या मनाचा विचार करणं
जरुर आहे हे आपण आचरणं
आणि मुलांना अनुकरण करायला लावणं

कितपत ठीक आहे वस्तू घेणं
आणि काही दिवस वापरुन परत देणं
मिळणार्‍या संधींचा गैरवापर करणं
आणि भविष्यातल्या संधींना हकनाक मुकणं

दुकानात आदल्या दिवशी गोष्टी लपवणं
सेलच्या दिवशी नेमक्या उचलणं
आणि इतरांना परावृत्त करण्याऐवजी
कसा पराक्रम केला हे सांगत मिरवणं

आपल्याकडे गोष्टींची असली चणचण
तरी कठिण आहे मनाला पटणं
चहासाठीचं दूध फुकटात पिणं
आणि साखरेची पाकिटं खिशात भरणं

कोजगिरीच्या दुधात पडेल विरजण
उद्या जर म्हणाले काहीजण
की असेल संस्कृती महान
पण आहे का तिचं आचरण

आरडाओरड करत फिरू वणवण
पण ऐकण्याच्या स्थितीत असेल कोण
काळजीने मनावर येते दडपण
आपलही न होवो नामकरण

- प्रसन्न माटे.