गौरवगाथा तुझी भारता -'कोरस' टाटांच्या ताब्यात! लंडनमध्ये रोवला पोलादी झेंडा!

टाटा स्टीलने अखेर प्रतिस्पर्धी ब्राझिलच्या 'सीएसएन'वर मात करून इंग्लंडचे पोलाद उत्पादक 'कोरस ग्रुप'ची खरेदी करण्यात यश मिळविले! लंडनमध्ये भारतीय 'टाटां'चा झेंडा फडकावणारा हा सौदा झाला ११.३ अब्ज डॉलर्सना! 'कोरस'ची लढाई जिंकल्यानंतर टाटा स्टील आता जगातील ५ व्या क्रमांकाची सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी बनली आहे. भारतीय उद्योग क्षेत्राचे आजवरचे हे 'बिगेस्ट टेकओव्हर' ठरले आहे.

'कोरस'साठी हे 'ऑक्षन' तब्बल आठ तास, नऊ फेर्‍यांमध्ये चालले. दीर्घ, मानसिक ताणतणावांच्या लिलावांमधील नवव्या फेरीनंतर टाटा स्टीलने 'कोरस'च्या प्रत्येक शेअरला ६०८ पेन्सच्या भावाने बोली जिंकली. हा लिलाव आयोजित करणार्‍या 'युके टेकओव्हर पॅनल'ने ऑक्षनची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे व टाटा स्टील विजेती कंपनी ठरल्याची घोषणा केली. ब्राझिलच्या 'सीएसएन'च्या ('कम्पानिया सिदेरुजिर्का नॅसिओनल') त्याआधीच्या ६०३ पेन्सच्या बोलीवर टाटांनी मात केली.

ही 'लिलाव लढाई' जिंकण्यासाठी टाटांना आपली बोली ('बिड') अर्थात शेअर्सची प्रत्येकी किंमत तब्बल ३३.६ टक्क्यांनी वाढविणे भाग पडले. उद्योग जगतातून या विजयाबद्दल टाटांवर अभिनंदनांचा वर्षाव झाला. औद्योगिक इतिहासात टाटांच्या 'कोरस टेकओव्हर'ची नोंद 'वन ऑफ द मोस्ट फीअर्सली फॉट अ‍ॅक्विजिशन वॉर्स' म्हणून होणार आहे.

११.३ अब्ज डॉलर्सचा हा सौदा येत्या मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

गौरवगाथा तुझी भारता - टाटांनंतर बिर्लांची झेप! भारतीय कंपनीचे दुसरे मोठे टेकओव्हर !

महाकाय उद्योग समूह ' आदित्य बिर्ला ग्रुप ' ने रविवारी अमेरिकेत अ‍ॅटलांटामध्ये मुख्यालय असलेली ' नॉव्हेलिस ' ही अ‍ॅल्युमिनियम कंपनी रोख दाम मोजून खरेदी केल्याची घोषणा करून टाटा समूहाने सोडलेला ' अश्वमेधाचा वारू ' आणखी पुढे दौडवला! हा सौदा सहा अब्ज डॉलर्सना ठरला असून , तो पूर्ण झाल्यानंतर ' एव्ही बिर्ला ' समूहाची हिंदाल्को ही जगातील सर्वात मोठी ' रोल्ड अ‍ॅल्युनिमियम ' उत्पादक कंपनी बनणार आहे ! नॉव्हेलिसचा विस्तार १२ देशांमध्ये असून कंपनीत १२ हजार कर्मचारी आहेत

' हिंदाल्को ' ला येत्या तीन वर्षांत ' फॉर्च्युन ५०० ' यादीत समावेशासाठी पात्र बनविण्याचे बिर्ला समूहाचे (अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला) उद्दिष्ट आत्ताच साध्य होत आहे.

हिंदाल्को-नॉव्हेलिस कंबाइनच्या शेअर्सचे सध्याचे बाजारमूल्य ७.५ अब्ज डॉलर्स असून , त्यामुळे हिंदाल्को जगातील सर्वात मोठी ' अ‍ॅल्युमिनियम रोलिंग ' कंपनी , आशियातील सर्वात मोठ्या प्रायमरी अ‍ॅल्युमिनियम उत्पादकांपैकी एक आणि भारतातील अग्रगण्य तांबे उत्पादक बनणार आहे.

गौरवगाथा तुझी भारता - भारतीय कंपन्यांच्या टेकओव्हरपासून सावधान !.


या वर्षात आतापर्यंत भारतीय कंपन्यांनी विदेशी कंपन्या ताब्यात घेण्यासाठी १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. विदेशी कंपन्यांनी भारतात केलेल्या गुंतवणुकीपेक्षा भारतीय कंपन्यांची गुंतवणूक दुप्पट आहे ! भारतीय अर्थव्यवस्थेची आणि कंपन्यांच्या जागतिक पातळीवरील विस्ताराची 'टाइम मॅगेझिन'ने दखल घेतली असून 'तुमची स्पर्धक असलेली बडी भारतीय कंपनी तुम्हालाच खिशात टाकेल, तेव्हा सावध असा!' अशी सूचनाच बड्या विदेशी कंपन्यांना दिली आहे.

भारताची अर्थव्यवस्था तेजीत असून घरच्या चांगल्या परिस्थितीच्या भरवशावर स्थानिक कंपन्या विदेशात ठसा उमटवण्यास उत्सुक आहेत.काही उदाहरणे :

- कोरस कंपनी ताब्यात घेण्यासाठी टाटा स्टीलची ८.१ अब्ज डॉलरची निविदा.
- डॉ. रेड्डीजमध्ये बिटाफर्म या जर्मन कंपनीचे ५७.२ कोटी डॉलरना झालेले विलिनीकरण
- पुंज लॉइडमध्ये झालेले सिंगापूरस्थित सेंबकॉर्पचे विलिनीकरण
- कोरियन बडी कंपनी देऊ इलेक्ट्रॉनिक ताब्यात घेण्यासाठी व्हिडीयोकॉनने दिलेली ७० कोटी डॉलरची ऑफर.
- टाटाच्या ताब्यात 'निस्सान'चा कारखाना आणि येमेन सरकारकडून "ओेनजीसी' व रिलायन्स इंडस्ट्रीजला प्रकल्प स्थापण्यास आमंत्रण

फ्रान्समधील एका संस्थेच्या अभ्यासानुसार भारतीय कंपन्यांनी युरोपमधील १७६ कंपन्यांत गुंतवणूक केली.

येमेन सरकारकडून "ओेनजीसी' आणि रिलायन्सला प्रकल्प स्थापण्यास आमंत्रण


येमेन सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला (ओएनजीसी) अरब किनारपट्टी इथे एक अब्ज डॉलरचा तेल शुद्धीकरण प्रकल्प स्थापण्यासाठी आमंत्रण दिले आहे. .......

दिवसाला एक लाख पिंप उत्पादन क्षमतेच्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पात भागीदारी करण्यासाठीचा प्रस्तावही ठेवला असल्याचे येमेनचे तेल मंत्री खालिद दहाह यांनी सांगितले.

रिलायन्स इंडस्ट्रीज येमेनमध्ये दिवसाला पन्नास हजार पिंप उत्पादन क्षमता असणारा प्रकल्प हुड ऑइलबरोबर भागीदारी तत्त्वावर बांधणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून, तो बांधण्यास तीन वर्षे लागणार आहेत.