कार्यक्रम २००९ - ओबामाच्या देशात

दिनांक २० सप्टेंबर २००९ रोजी ब्लूमिंगटन पब्लिक लायब्ररी च्या कॅम्युनिटी हॉल मध्ये दुपारी ३:०० वाजता, "ओबामाच्या देशात" हा एकपात्री प्रयोग संपन्न झाला.

या एकपात्री प्रयोगाचे लेखक आणि सादरकर्ते होते... महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार, कथालेखक, स्तंभलेखक, कथाकथनकार व वक्ता - डॉ. श्रीकांत गोडबोले. हा एकपात्री प्रयोग त्यांच्या लवकरच प्रकाशित होणाऱ्या "ओबामाच्या देशात" याच नावाच्या प्रवासवर्णनपर पुस्तकावर आधारित होता. त्यांची आजवर १६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी आपले साहित्य येथील सन्मित्र वाचनालयास भेट म्हणून दिलेले आहे. ते सध्या आपल्या मुलाकडे - अनिरुद्ध गोडबोले - कडे आलेले आहेत.

"ओबामाच्या देशात" चे थोडक्यात कथानक असे आहे. अण्णा (वय वर्षे ६०) आपल्या अमेरिकेतील मुलाकडे ५ - ६ महिन्यांसाठी सपत्नीक गेले होते. त्यांच्या पत्नी सध्या मुलाकडेच थांबल्या असून, एकटे अण्णा भारतात परतले आहेत. आपल्या गावी परत पोचल्यावर, लगेचच रस्त्यात त्यांची 'वशा' शी (त्यांचा बालमित्र) गाठ पडते. वशा, अण्णांना आपल्या घरी घेऊन जातो. अण्णा त्याला अमेरिकेतील किस्से, गमती-जमती सांगतात. गप्पा रंगत जातात. दीड तास गप्पा मारल्यावर जेवणाचे आमंत्रण घेऊन अण्णा आपल्या घरी निघून जातात.

प्रथम पदार्पणातच रंगमंचाची घेतलेली पकड; रंगमंचावरचा सहज वावर; अण्णांचे जबरदस्त बेअरिंग; केवळ अभिनय, संवादफेक व टाईमिंगच्या ताकदीवर प्रेक्षकांसमोर उभी केलेली वशा व वाहिनी हि दोन पात्रे; प्रवासामुळे थकलेले तरी विलक्षण उत्साही दिसणारे, थोडेसे रंगेल, खट्याळ, मिष्किल असे अण्णा; त्यांनी प्रेक्षकांसमोर जिवंत केले. खुसखुशीत विनोद, कधी पोट धरून हसविणारे प्रसंग, कधी मार्मिक भाष्य, कधी हृद्य समीक्षा असा हा "ओबामाच्या देशात" चा प्रयोग प्रेक्षकांमध्ये हशा पिकवित, मधूनच अंतर्मुख करीत, महत्वाच्या वाक्यांवर उत्स्फूर्त दाद घेत ब्लूमिंगटनच्या रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करून गेला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, डॉ. गोडबोले यांचा परिचय व आभार प्रदर्शन श्री. गौतम करंदीकर यांनी करून दिला. एकपात्री प्रयोगाची संकल्पना आणि संयोजन अनिरुद्ध गोडबोले यांचे होते. कार्यक्रमाचे फोटो वैभव शिरोडकर यांनी काढले तर व्हीडीओ समीर बिल्डीकर यांनी केले.

यापूर्वी डॉ. श्रीकांत गोडबोले यांच्या कथाकथनाला येथील मराठी रसिकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या या एकपात्री प्रयोगाला रसिकवर्ग आवर्जून व बहुसंख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे पोस्टर / कार्यक्रमाची छायाचित्रे / व्हीडीओ




कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००