मराठी शिकुया आनंदे....!

आधी बीज एकले... बीज अंकुरले... रोप वाढले.

अमेरिकेत राहणारे आणि मनाने महाराष्ट्रात रमणारे आपण रोज ई-सकाळ, महाराष्ट्र टाईम्स् यासारखी मराठी वृत्तपत्र आवर्जुन वाचतो, नव्हे तो आपल्या दिनक्रमाचा अर्विभाज्य भागच असतो. यातच कदाचित ई-सकाळमध्ये ३१-ऑगस्ट-२००७ रोजी आलेली ही बातमी आणि त्यावरचा हा व्हिडीओ आपल्या वाचनात आली असेल. पुण्यात सध्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ (अर्थात् एस्.सी.ई.आर्.टी) ७५ शाळांमध्ये एक प्रयोग राबवत आहे. या प्रयोगात ते मुलांना एका वैशिष्टयपूर्ण पद्धतीने मातृभाषा (मराठी) वाचायला शिकवणार आहेत. अपेक्षा अशी आहे की या पद्घतीत ही मुलं पारंपारिक पद्धतीपेक्षा लवकर, अधिक अर्थपूर्ण आणि आनंदाने मातृभाषा शिकणार आहेत. आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला तर ही पद्धत संपूर्ण महाराष्ट्रभरच्या मराठी माध्यमाच्या शाळांत (साधारणपणे ६९,०००हून अधिक) राबवण्यात येईल. बातमी तर आहे उत्साहवर्धक, पण तुम्हाला कल्पना आहे का, की या प्रयोगाची बीजं इथे, या आपल्या ब्लुमिंग्टन् मध्ये रोवली गेली आहेत!! होय आपल्या ब्लुमिंग्टन् मध्ये....

महाराष्ट्राबद्दल आपल्याला खासच अभिमान आहे आणि तो तसा वाटावा असा सार्थ इतिहास आणि परंपराही आपल्याला लाभलेल्या आहेत. या श्रीमंत परंपरेच्या खजिन्याला पोचण्याचं आपलं महाद्वार आहे आपली माय मराठी भाषा. या माय मराठीच्या अंगाखांद्यावर खेळतच आपण मोठे झालो. भूपाळीपासून अंगाईपर्यंत आणि अभंगांपासून ते लावणीपर्यंत तिची ही जीवनसत्वं आपल्या मनाना वर्षानुवर्ष बळकट करीत आली आहेत. आपल्यावर जबाबदारी आहे ही परंपरा, ही जीवनसत्वं आपल्या पुढच्या पिढीला उपलब्ध करून द्यायची.

काहीशा अशाच विचारांनी प्रेरीत झालेल्या, पण ते कसं साध्य करायचं अशी चिंता पडलेल्या काही ब्लुमिंग्टन् वासी माता/पित्यांची २००५ च्या उन्हाळ्यात गाठ पडली डॉ. व. सी. देशपांड्यांशी. स्वतः भाषाशिक्षण तज्ञ असलेले डॉ. देशपांडे आपल्या नातवाला भारताहून भेटायला आले होते. या पालकांची चिंता समजल्यावर डॉ. देशपांडे यांनी त्या नातवाला आणि त्याच्या तीन मित्रांना मराठी शिकवण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी या पालकांना आश्वासन दिले “… माझ्या वास्तव्याच्या तीन महिन्यात ही मुलं मराठी वाचायला शिकतील…”. खरं तर त्या पालकांना प्रत्यक्षात हे घडेल असा फारसा विश्वास काही वाटला नाही. पण त्यानिमित्ताने उन्हाळ्याच्या सुट्टीत या “उद्योगी” मुलांना एक उद्योग मिळेल आणि मराठीच्या चार अक्षरांशी तरी ओळख होईल, या माफक अपेक्षेने त्यांनी त्या चार बालकांना डॉ. च्या स्वाधीन केले. वेळ होता रोजचा फक्त एक तास. आणि....

काय सांगता महाराजा, केवळ तीन महिन्यांनंतर ही चारही मुलं बाळबोध मराठी वाक्यं, नव्हे धडे, कविता न अडखळता, अर्थ समजून आणि आनंदानी वाचायला लागलीसुद्धा!!

कशी काय घडली बुवा ही किमया? एरवी शाळेच्या दिवसातसुद्धा अभ्यासाला कुरकुर करणारी ही मुलं सुट्टीत, आनंदानं, आपणहुन एवढी भरभर मराठी वाचायला शिकलीच कशी? हा जसा त्यांच्या पालकांना प्रश्न पडला होता, तसाच मराठी संस्कृतीच्या प्रसारासाठी एकत्र आलेल्या आपल्या ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळाच्या कार्यकारणीलाही.

मग कार्यकारिणीने डॉ. देशपांड्याच्या या पद्धतीच्या प्रात्यक्षिका साठी आणि त्यानंतरच्या प्रश्नोत्तरासाठी एक कार्यक्रम ब्लुमिंग्टन् च्या सार्वजनिक ग्रंथालयात भरवला. त्यात या चार मुलांनी आपल्या नव्याने आत्मसात केलेल्या कौशल्याचा देखणा अविष्कार तर केलाच

पण डॉ. देशपांड्यांनी या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर टिपण्णी देखील केली. याशिवाय त्यांच्या इथल्या वास्तव्यात डॉ. देशपांड्यांनी या प्रयोगावर एक पुस्तक लिहीले आहे, ज्यात ही शिक्षणपद्धती सोप्या भाषेत समजावून दिली आहे. जी वापरून उत्सुक पालक आपल्या पाल्यांना मराठी वाचायला शिकवूही शकतील

पुढे या कार्यक्रमावर एक व्ही.सी.डी. बनवण्यात आली. जी डॉ. देशपांडे पुण्यात आणि पुढेपुढे संपूर्ण महाराष्ट्रात दाखवू शकले. ज्यामुळे या शिक्षणपद्धतीचे प्रात्यक्षिक लोकांना प्रत्यक्ष अनुभवता आले आणि त्यांचा या पद्धतीवर अधिकाधिक विश्वास बसू शकला. त्या प्रयत्नांचे पुढचे पाऊल म्हणजेच एस्.सी.ई.आर्.टी.चा हा प्रकल्प होय..

डॉ. देशपांड्याची ही कार्यपद्धती भर देते ती समजून शिकण्यावर, पाठांतरावर नव्हे. या शिक्षणपद्धतीत सर्वात छोटा घटक अक्षर नसून शब्द आहे. कारण त्यांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे. अर्थ नसणारी मुळाक्षरं गिरवण्यापेक्षा अर्थपूर्ण शब्द मुलं ‘शब्द-चित्रं’ म्हणून लक्षात ठेवतात. आणि हळूहळू याच पद्धतीने त्यांची ‘दृक-शब्दसंपत्ती’ वाढवत नेली जाते. गंमत म्हणजे साधारण ४० वर्षापूर्वी डॉ. नी याच विषयावर पी. एच्.डी. केली होती आणि त्याहीवेळी सरकार दरबारी त्यांनी प्रयत्न करून पाहिला होता, कदाचित त्यावेळी त्यांना ब्लुमिंग्टन् सारखी उत्साही पालक मंडळी अथवा जाणकार कार्यकारिणी मिळाली नसावी.

कारण कहीही असो, ब्लुमिंग्टन् मंडळाला या सर्व घटनाक्रमाबद्दल अत्यंत आनंद होतो आहे आणि एका स्तुत्य बदलाला सुरवात आपल्या गावातून झाली याचा सार्थ अभिमानही. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा असलेल्या या प्रकल्पाला आणि मातृभाषा शिक्षणाच्या एका महत्वाच्या टप्प्याला ब्लुमिंग्टन् मराठी मंडळाच्या हा्र्दिक शुभेच्छा....!!!

या प्रकल्पाविषयी, या पद्धतीविषयी काही प्रश्न असतील अथवा डॉ. देशपांड्यांच्या या पद्धतीवरील पुस्तकाच्या प्रती हव्या असतील तर मयुरेश देशपांडे यांना ई-मेल करा.

कार्यक्रमाचे पोस्टर

डॉ. व. सी. देशपांडे यांचे “शिकुया आनंदे” हे पुस्तक मंडळाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहे