पाडवा

नमस्कार मंडळी,

मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा.कवी कुसुमाग्रज मराठी भाषेचे गोडवे गाताना म्हणतात,

            माझ्या मराठी मातीचा

            लावा ललाटास टिळा

            हिच्या संगाने जागल्या

            दर्याखोऱ्यातील शिळा

ब्लूमिंगटन मराठी मंडळाने सातासमुद्रापार संक्रांत, गणेशोत्सव, गुढीपाडवा, आषाढी एकादशी अशा विविध उपक्रमातून आपली मराठी भाषा आणि संस्कृती जपत वरील शब्द अक्षरश: खरे केले आहेत आणि करत आहेत.

2017 नंतर तब्बल पाच वर्षांनी 2023 च्या 3 मार्च ला गौरी करंदीकर यांनी ब्लूमिंगटन नॉर्मल मराठी मंडळाच्या 17 व्या नाटकाची घोषणा केली.पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा नाटक बघायला मिळणार म्हणून ब्लूमगावातील मराठी लोकांमध्ये उत्सुकता होती.

रत्नाकर मतकरी लिखित  आणि गौतम करंदीकर दिग्दर्शीत " माझ्या नवऱ्याची बायको " हे मराठी नाटक  8 एप्रिल या दिवशी ' हार्टलॅन्ड कम्युनिटी कॉलेजच्या ऑडिटोरियम ' मध्ये सादर झाले.

दिग्दर्शन सहाय्य - गौरी करंदीकर पार्श्वसंगीत आशिष डहाके ,

प्रकाशयोजना-- गणेश भदाणे, नेपथ्य मयुरेश कुलकर्णी, प्रवीण फेंगडे, अण्वेश जोशी

विशेष सहाय्य -- अनुजा दुर्वास , प्रतीक उमाटे

नाटकाचे थोडक्यात कथानक असे : -प्राध्यापक पोफळे आणि त्यांची दुसरी बायको परी यांचा प्रेमाविवाह होतो.प्राध्यापकांची पहिली बायको पाचवर्षांपूर्वी गेली असतें. त्यांच्या घरात एक फटू नावाचा नोकर असतो जो अगदी खुट्ट झाले तरी घाबरणार इतका भित्रा असतो.परी आणि प्राध्यापक लग्न करतात हे परीच्या आईला पसंत नसते. ती आपली नाराजी व्यक्त करायला आणि मुलीला भेटायला म्हणून येते. प्राध्यापक पोफळेचा एक डॉक्टर मित्र डॉ. एकशिंगे ( ज्याला दवाखान्यात बसायला वेळच नसतो )हा बऱ्याचदा प्राध्यापकांकडे येत जात असतो.

एकदा असेच डॉ. एकशिंगे राघोभरारी नावाच्या भोंदूबाबाला घेऊन प्राध्यापकांकडे येतो. या राघोभरारीचा पर्दाफाश करून त्याला पोलिसांकडे नेण्याचा  डॉक्टरांचा कट असतो.. राघोभरारी त्याचे सामान रचून,मंत्र तंत्र जप करत, आत्म्याला बोलवायला सुरु करतो. प्राध्यापक, डॉक्टर, परी, परीची आई, सगळे हे आश्चर्याने पाहत असतात. हे सुरु असतात प्राध्यापकांची पहिली बायको प्रिया हिचा आत्मा खोलीत येतो. मुख्य म्हणजे ही प्रिया फक्त प्राध्यापकांनाच दिसत असतें आणि तिचे बोलणेही फक्त त्यांनाच ऐकू येत असतें. प्राध्यापक पहिल्या बायकोच्या येण्याने थोडे भांबावतात, आनंदित होतात, आणि विचित्र वागायला लागतात. हे परिच्या लक्षात येते. ती डॉक्टरांना सांगते आणि ते दोघे प्राध्यापकांना गोडीत घेऊन विचारतात तेव्हा त्यांना कळते की त्यांची पहिली बायको प्रिया त्यांना दिसतेय.

या नंतरच्या कथानकात परी, डॉक्टर एकशिंगे आणि राघोभरारी हे तिघे मिळून प्रियाच्या आत्म्याला कसे परत पाठवतात हे पाहण्यासारखे आहे.

पाहिला अंक उत्कंठा वाढवून जातो तर दुसरा अंक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू आणतो.

 

गौतम करंदीकर यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि सगळ्याच कलाकारांच्या अद्वितीय कामगिरीने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

प्राध्यापक पोफळेच्या भूमिकेला असलेला विनोदी टच पात्रामध्ये  अगदी चोखपणे संदीप कोद्रे यांनी आणलाय. प्राध्यापक आणि परी मध्ये असलेले वयाचे अंतर पण तरीही त्यांच्यात असलेले प्रेम काळजी ही परीची भूमिका करणाऱ्या कल्याणी धोटेने अप्रतिमरित्या दाखवली आहे.

पराग काजरोळकरचा अभिनयचा अनुभव तगडा असल्याने डॉक्टरांची भूमिका त्याने उत्तम बजावली आहे.

आईचे काम करणाऱ्या तृप्ती कोद्रेची भूमिका लहानशी असली तरी भाव खाऊन गेली. प्रेक्षकांना तृप्तीचा रंगमांचावरचा वावर पाहून वाटलेच नाही की ती पहिल्यांदाच काम करतेय. राघोभरारीची भूमिका सुशील दुर्वास यांनी सहजरीत्या साकारलीये. त्या पात्राच्या व्यक्तिमत्वासाठी लागणारा उग्रपणा छान रेखाटलाय. प्रियाच्या भूमिकेला वल्लरी जोशीने योग्य न्याय दिलाय. प्रोफेसरांना परत मिळवण्यासाठीच्या प्रयत्नातील आक्रमकता, जिद्दीपणा, प्रसंगी क्रूरपणा तिने आपल्या भन्नाट अभिनयातून सुंदर साकारलाय.

आयत्या वेळी आलेल्या काही अडचणीमुळे मूळ कलाकाराऐवजी फटूची  भूमिका अभिजीत कुलकर्णीना करावी  लागली . अभिजीत अनुभवी कलाकार असल्याने केवळ 3 दिवसात डायलॉग पाठ करून  फटूची भूमिका तंतोतंत वठवली .अभिजीत कुलकर्णीचे आभार मानावे तितके कमी आहे.

या सगळ्या गुणी कलाकारांच्या मेहनतीने आणि आपण मायबाप प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे  ब्लुमिंगटन नॉर्मल मराठी मंडळाच्या नाट्यपरंपरेत  आणखी एक सोनेरी पान जोडले गेले. पुन्हा भेटू नव्या उत्साहात नवीन नाटक घेऊन लवकरच 😊.

यंदा गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात कलाप्रदर्शनाचेही आयोजन केले होते .

मंडळातल्या गुणी कलाकारांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला .

या प्रदर्शनात खालील कलाकारांचा सहभाग होता

श्रेया मोकाशी , विनय मोकाशी , ध्रुव जोशी , धृती जोशी , राजस पाटीलशनाया पाटील आकाश आणि रिकिता परांजपे अरायना भिसे , मोनिका घाटे , अनन्या जोशी ,अन्वी  जोशी शर्वरी जोशी  , ऊर्जा  हिंदुराव , श्रुती  छप्रे ,आणि शर्मन गोखले . या प्रदर्शनात  एक  से एक देखण्या कलाकृती  पहायला मिळाल्या .  सगळ्याच   कलाकारांनी एका  सुंदर  कलाप्रदर्शना चा अनुभव दिला .

कलाप्रदर्शनाचे संयोजन केले होते अनुजा दुर्वास , सोनाली मोकाशी, ,गीतिका सोनावणे यांनी  तर विनय मोकाशी ,दिनेश सोनावणे यांनी मांडणीसाठी सहाय्य्य केले .

एका कार्यक्रमाच्या  मागे मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांचे कष्ट असतात

समीर आगरकर, केदार कुलकर्णी , रोहित काळे , अनंत गोखले विशाल जोशी ,स्नेहल जोशी , लीना भिसे यांनी कार्यस्थळ व्यवस्था पाह्यली तर तिकीटविक्री  सचिन किर्दत  आणि  रश्मी गोखले यांनी सांभाळली .

सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद

वृत्तांकन --शर्वरी जोशी


आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल      


Natak 2023

Art Exhibition 2023


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००