पाडवा

उमजून घेता घेता आजची नवी पिढी
उभारली आम्ही ती नवविचारांची गुढी !

प्रथे प्रमाणे यावर्षीही आपल्या मराठी मंडळाने गुढीपाडव्यानिमित्त सचिन मोटे लिखित आणि गौतम करंदीकर दिग्दर्शित “करार प्रेमाचा “या नाटकाची खमंग मेजवानी दिली. १३ एप्रिल रोजी The Attractive Alternative येथे सादर झालेल्या या नाटकाला रसिकांनी मनापासून प्रतिसाद दिला.

नाटकाच्या उठावदार सुरुवातीने प्रेक्षक अलगद देशमुखांच्या कुटुंबात प्रवेश करतो. नाना देशमुख हे वयस्कर गृहस्थ आपली पत्नी नानी, मुलगा अशोक, सून वंदना आणि नातू शौनक यासोबत सुखाने आयुष्य व्यतीत करत असतात. शौनक हा एक हुशार, होतकरू IT engineer.त्याच्या व घरातील मोठ्यांच्या विचारातील अंतर, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली येऊन त्यानी घेतलेला निर्णय, त्या निर्णयानी घरातील सर्वांची होणारी घालमेल, या सर्वातून जे नाट्य निर्माण होते ते म्हणजेच "करार प्रेमाचा".

शौनक आणि त्याची मैत्रीण वैदेही जेंव्हा त्यांचा लग्न न करता तसच एकत्र रहाण्याचा निर्णय घरात सांगतात तेंव्हा अख्खं घर सैरभैर होत.रूढी परंपरा या मध्ये अडकलेली जुनी मनं हा निर्णय स्वीकारायला तयार होत नाहीत. नाना देशमुख मात्र हा नवविचारांचा प्रवाह समजावून घेतात व आपल्या कुटुंबात सामावूनही घेतात, सहवासाने प्रेम वाढत आणि अस खर प्रेम कुठल्याही करारात अडकवता येत नाही हा अनुभवी विचार त्या मागे असतो आणि या दोघांमधले प्रेम आज ना उद्या त्याना नक्की लग्ना पर्यंत घेऊन जाईल अशी नानांची अटकळ असते.

वैदेही देशमुखांच्या घरात पाउल टाकते आणि घरातील प्रत्येकाच्या सुख दुखा:त समरसून जाते. नवीन पिढीचे positive विचार व बेधडक वृत्ती घरातील सर्वांनाच नवीन दृष्टीकोन देतात आणि निराशेच्या गर्तेतून बाहेर काढतात. वैदेहीलाही सहवासाने या कुटुंबातील उब आणि गोडवा हवाहवासा वाटू लागतो.प्रेमाच्या आणि विश्वासाच्या माणसांपुढे तिला व्यवहारी करार थिटा वाटू लागतो.
यातूनच ती तिची लग्न करायची इच्छा व्यक्त करते आणि कथानक एक वेगळच वळण घेते.

Live in relationship या सध्याच्या नाजूक आणि गंभीर सामाजिक प्रश्नाचा उहापोह करीत पारंपारिक विवाह संस्थेचे महत्व अधोरेखित करीत नाटक संपते. लेखकाने हा गंभीर विषय अत्यंत हलक्या फुलक्या हृदयाला हात घालणा-या संवादांनी रंजक केला आहे. गौतम करंदीकरांच्या दिग्दर्शनाचा परीस स्पर्श लाभल्याने या नाटकाने निखळ मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना विचार करण्यासही प्रवृत्त केल.

गौतम करंदीकरांनी साकारलेले नाना इतके दिलखुलास व नवमतवादी आहेत की असे वाटते अगदी प्रत्येक घरात असे नवीन पिढीला सामावून घेणारे नाना हवेतच.

या नाटकातली “नानी “ ची भूमिका गौरी करंदीकरांनी अक्षरशः अजरामर केली.सुरुवातीचीची आग्रही ठाम नानी, नानांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर मात्र सौम्य आणि समंजस होते. बदलत्या परिस्थिती नुसार नानींच्या आवाजातील variations अत्यंत लक्षवेधक.

वैदेहीच्या भूमिकेत होती सोनल पाटील.... बिनधास्त आणि नविन मतं मांडणारी... प्रेमात हळवी होणारी...घरात सहज समरस होणारी वैदेही या विविध छटा सोनल ने अत्यंत उत्तम प्रकारे रंगवल्या.

जुन्या रूढीच्या चौकटी झुगारु पहाणारा, वैदेहीच्या लग्नाच्या प्रस्तावाने आश्चर्य चकीत आणि अस्वस्थ झालेला दोलायमान मनस्थितीतला “शौनक “ गणेश अनभुले यांनी अत्यंत समर्थपणे साकारला.

अशोक ची भूमिका मोहित पोतनीस यांनी यथायोग्य सादर केली.आयुष्यात सतत अपयशी ठरलेला पण तरी जगाच्या चांगुलपणावर विश्वास असलेला, साधा सरळ अशोक मोहितने आपल्या देहबोलीतून छान साकार केला.

सुखदा खोंबारे यांनी अपयशी नव-यालाही मनापासून साथ देणारी, त्याच्या चांगुलपणावर प्रेम करणा-या वंदना ची भूमिका खूपच छान केली. बोलण्याची लकब, अचूक संवाद फेक यामुळे नाटकाला एक वेगळीच रंगत आली.

बिहारी भैय्याची उठावदार भूमिका केली होती राहुल कुलकर्णी यांनी. त्याचा टिपिकल बिहारी टोन,वेशभूषा याने त्याचे मराठीपण कुठेही जाणवले नाही.

नाटकाला आणखी बहार आणली ती मंडळाच्या कलाकारानी रचलेल्या व गायलेल्या गाण्याने.....या गाण्यावर मनसोक्त नाचणारे कलाकार पाहून आपण राजश्री मुव्हीज चे एखादे सिनेमातले दृश्य पाहतोय असच वाटलं क्षणभर.

नागेश गालपल्ली यांच्या साजेश्या पार्श्वसंगीताने नाटकाला आणखी उठाव आला.

सर्व कलाकारांची वेशभूषा खास उल्लेखनीय. नेपथ्य, प्रकाश योजना या सगळ्याचीच भट्टी अगदी छान जमून आली होती.

गंभीर विषयाची मनोरंजक मांडणी करून प्रेक्षकाना विचारप्रवृत्त करण्या हे नाटक १०० % यशस्वी झाले.

नेपथ्य रोहन नाईक,  स्वप्नील राऊत
प्रकाशयोजना गणेश भदाणे
पार्श्वसंगीत नागेश गालपल्ली
रंगमंच व्यवस्था अक्षय साटम,  कल्याणी गालपल्ली
विशेष सहाय्य ऋजुता दुर्वास,  विक्रम चिमोटे,  नीलम चिमोटे,  मंदार कुलकर्णी, अनंत गोखले, गायत्री भदाणे,  अमोल होशिंग
अल्पोपहार व्यवस्था आशीष आणि श्रुती डहाके,  समीर आगरकर,  सिद्धार्थ आणि पल्लवी खाडे
तिकीट विक्री उदय परांजपे,  अभिजित नेरुरकर
व्हिडीओ चित्रण मुक्ता कुलकर्णी
फोटो स्वप्नील राउत
वृत्तांकन दीपाली देशपांडे

धन्यवाद!

आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल

नाटकाचे पोस्टर     

नाटकाची छायाचित्रे 


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००