पाडवा -नाटक वृत्तांत - "ब्लॅकमेल"

नमस्कार

मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा , आणि दरवर्षी ब्लूमिंगटन-नॉर्मल च्या मंडळींचे नववर्ष सुरु होते ते मराठी नाटकाने. दरवर्षी मराठी मंडळातर्फे पाडव्यानिमित्त सर्वांना दर्जेदार मराठी नाटकाची मेजवानी दिली जाते. येथे खास करून "सर्वांना" हा उल्लेख केला आहे कारण नाटक जरी मराठी असले तरी ते बघण्यासाठी अमराठी भाषिकही जिव्हाळ्याने उपस्थित राहतात, आणि अर्थातच त्यांच्या दुभाषिकाच्या सहाय्याने नाटकाची मजा लुटतात! ब्लूमिंगटन-नॉर्मलचेच रहिवासी नाहीत तर शिकागोपासून - शॅंपेनपर्यंतचे प्रेक्षकही खास नाटक बघण्यासाठी २ ते ३ तास प्रवास करून येतात

या वर्षी सादर झाले ... "ब्लॅकमेल". इंग्लिश नाटकाचा मराठी अनुवाद केला आहे सरिता पदकी यांनी .

गौतम
करंदीकर दिग्दर्शित हे नाटक एप्रिल १४ रोजी The Attractive Alternative येथे सादर करण्यात आले. नावाप्रमाणे नाटकाचे कथानक अर्थातच ब्लॅकमेल या विषयावर आधारित होते. नावावरून जरी नाटक धीरगंभीर वाटत असलं तरी त्यात अनेक विनोदी रंगछटाही होत्या.

हे नाटक मूळचं ३५-४० वर्षांपूर्वीचं. त्यामुळे हे नाटक आजच्या प्रेक्षकांपुढे सादर करताना, त्याच्यावर काळानुसार बदल करण्याची व पुनर्लेखनाची जबाबदारी दिग्दर्शकांवर येऊन पडते. अर्थातच कुशल दिग्दर्शक गौतम करंदीकरांनी ही दुहेरी जबाबदारी यशस्वीरित्या पेलली. या नाटकाची विशेष जमेची बाजू म्हणजे नाटकाचे कथानक गंभीर असूनही कुठेही त्रासदायक तणाव निर्माण होत नाही. याचेही श्रेय दिग्दर्शक गौतम करंदीकरांनाच दयावे लागेल. त्यांनी नाटकातील मुख्य कथेला समांतर अशा प्रसंगातील नाटकाचा वेग उत्कृष्टरित्या सादर करून नाटक सतत उत्कंठावर्धक व खुलवत ठेवलं आहे.

नाटकाचे थोडक्यात कथानक पुढील प्रमाणे --- अप्पासाहेब कर्वे आपली पत्नी मालती आणि कॉलेजात शिकणारा मुलगा निनाद यांच्यासह सुखासमाधानाने आयुष्य जगत असतात . अचानक एके दिवशी एक माणूस त्यांच्या घरी येऊन धडकतो आणि अप्पासाहेबांना त्यांच्या गत-आयुष्यातील काही अपघात प्रसंगातील गुन्ह्यासंबंधात ब्लॅकमेल करुन अवास्तव पैशांची मागणी करतो. अप्पासाहेब या नकळत आलेल्या संकटाने पुरते अस्वस्थ होतात. त्याच दरम्यान अप्पासाहेबांचे शेजारी गर्गे , जे रहस्य कादंबरीकार असतात ते आपली नुकतीच लिहून झालेली पण अप्रकाशित अशी कादंबरी अप्पासाहेबांना वाचायला देतात. योगायोगाने ते कथानक नेमकं अप्पासाहेबांच्या जीवनात जे वादळ आलेलं असतं त्याच्याशीच मिळत-जुळत असतं. ब्लॅकमेलच्या संकटाने ग्रासलेले अप्पासाहेब त्या कादंबरीतील मुख्य पात्राप्रमाणे वागण्याचे ठरवतात आणि ब्लॅकमेलरचा खून करण्याचा निर्णय घेतात इथेच खरं "नाट्य"सुरु होते.

अप्पासाहेब जेव्हा कादंबरीतील पात्राप्रमाणे वागायला लागतात तेव्हा नाटकात साधारण पुढे काय होणार याचा अंदाज प्रेक्षकांना येऊनही नाटकात असे काही विविध प्रसंग घडत जातात की त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढतच जाते. दिग्दर्शक गौतम करंदीकरांनी प्रत्येक नाट्यप्रसंग इतका उठावदार सादर केला आहे की, नाटक प्रेक्षकांना पुरते गुंतवून ठेवतं.

नाटकातील "अप्पासाहेब" ही मध्यवर्ती भूमिका मंदार कुलकर्णी यांनी जबरदस्त सादर केली . अचानक निर्माण झालेल्या ब्लॅकमेलिंगच्या वादळाने पुरते ढासळून गेलेले अप्पासाहेब, त्यातून पुन्हा सावरण्यासाठी अप्पासाहेबांनी केलेला प्रयत्न आणि या दोन्ही अवस्थेतील मनातली चलबिचलता मंदार कुलकर्णी यांनी आपल्या समर्थ अभिनयाच्या सर्व रंगछाटांनी उत्तम रंगवली.

ब्लॅकमेलर च्या भूमिकेतील पराग काजरोळकर यांनी समशेरसिंग ची सुरवातीची नाटकी विनम्रता आणि नंतर बदलेलं खलनायकी रूप आवाजातील चढउतारांसह अप्रतिम संवादफेक करून उत्तम सादर केले .विशेष उल्लेख करावा लागेल तो त्यांच्या सफाईदार हिंदीचा . त्यांच्या हिंदी संवादात कुठेही “मराठीपण” जाणवले नाही.

रोमेल पारसनीस यांनी इन्स्पेक्टर मोहितेंची भूमिका अतिशय रुबाबात सादर केली आहे. त्यांनी उभा केलेला इन्स्पेक्टर अस्सल ग्रामीण मराठी सिनेमातील दमदार इन्स्पेक्टरची आठवण करून देतो.

नेहमी पडद्या मागे राहून रंगमंच व्यवस्था सांभाळणारे विनोद म्हसे यावर्षी डॉ. लोकेंच्या भूमिकेत रंगमंचावरही आले . त्यांचे डॉक्टरांच्या भूमिकेतील चालणं ,बोलणं , एकंदरीतच धीर-गंभीर अभिनय हा भूमिकेला यथायोग्यच!!

अप्पासाहेबांचे शेजारी व रहस्यकादंबरीकार गर्गे यांच्या भूमिकेत होते गणेश अनभुले. आपण लिहिलेल्या कथेच्या मुख्य पात्राप्रमाणे अप्पासाहेब प्रत्यक्षात वागत आहेत हे जाणवल्या नंतर धक्का बसलेला पण , खात्री पटल्याशिवाय ते उघड बोलूनही दाखवता येत नाही अशा कात्रीत सापडलेला त्र्यंबक गर्गे, गणेश अनभुले यांनी सुंदर सादर केला. विशेषत: तिसऱ्या अंकात कमी विशेष संवाद असूनही आपल्या मूक अभिनयाने गणेश अनभुले यांचा गर्गे प्रेक्षकांवर विशेष छाप पाडून जातो.

प्रेक्षकांना हसवणे तसे सोपे नसते विषेशत: नाटक फार्सिकल नसताना सुद्धा योग्य विनोद निर्मिती करून प्रेक्षकांचा ताण कमी करणे हे खूप कौशल्याचे काम !! पण मालती कर्वेंच्या भूमिकेत गौरी करंदीकर ,निनादच्या भूमिकेत स्वप्नील राउत आणि बारटक्केंच्या भूमिकेत गौतम करंदीकर यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने विनोदाची बाजू अतिशय चोख बजावली. गौरी करंदीकर तर आपल्या मराठ-मोळ्या हिंदीने प्रेक्षकांच्या टाळ्या घेतात आणि स्वप्नील आपल्या प्रेमवीर स्टाईलने हशा पिकवतात!!

दिग्दर्शक
गौतम करंदीकरांनी नाटकातील सस्पेन्स आणि विनोद यांचे समीकरण उत्तम सांभाळले आहे. यामुळे नाटक प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करते.

नाटकातील कलाकारांव्यतरिक्त नाटकाची महत्वाची बाजू - नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाश व ध्वनी योजना!! यावर्षी फिश-टॅंक आणि प्रत्यक्ष बाल्कनी आणि तेथील फुलझाडं दाखवून नेपथ्य अजून आकर्षक केल्याबद्दल नेपथ टीमचे विशेष कौतुक!!

पार्श्वसंगीताची जबाबदारी धनंजय कुलकर्णी यांनी उत्तम पार पाडली.

प्रसंगानुरूप प्रकाश योजनेने महत्वाचे प्रसंग आणखी उठावदार केले गणेश भदाणे यांनी .

या यशस्वी नाट्यप्रयोगाच्या पडद्यामागची श्रेयनामावली....

पार्श्वसंगीत धनंजय कुलकर्णी
नेपथ्य अनुप तापकीर, रोहन नाईक, गणेश भदाणे 
प्रकाश योजना गणेश भदाणे 
विशेष साहाय्य गौरी कुलकर्णी, कांचन दामले
तिकीट विक्री निवेदिता कुलकर्णी, अनंत गोखले
कार्यस्थळ व्यवस्था श्रुती डहाके, आशिष डहाके, अनुजा दुर्वास, कल्याणी गोप
अल्पोपहार व्यवस्था श्वेताश्री म्हसे, सिद्धार्थ खाडे ,सुखदा खोंबारे, पल्लवी खाडे, समीर आगरकर, उदय परांजपे, दीपक टिळेकर
फोटोग्राफी अभिजित कर्णिक, विनय मोकाशी 
व्हिडीओ शूटींग मुक्ता कुलकर्णी ,अनंत गोखले, सुबोध दामले


आपल्या मंडळाच्या नाटकाचे दरवर्षीप्रमाणे सेंट लुईस व मिलवॉकी च्या मराठी मंडळात अनुक्रमे २० व २७ एप्रिल रोजी यशस्वी प्रयोग झाले.

वृत्तांकन
--- आश्लेषा राऊत.


नाटकाचे पोस्टर     
नाटकाची छायाचित्रे 

 


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००