'रिमोटकंट्रोल ' - नाटक वृतांत

'नाटक' हा मराठी माणसाचा तसा जिव्हाळ्याचा विषय, त्यातून परदेशात मराठी नाटक बघण्याचा योग म्हणजे दुधात साखर, ब्लुमिंग्टन् नॉर्मल वासियांची मात्र दर पाडव्याला या बाबत चंगळ असते कारण दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी मंडळातर्फे, दोन किवा तीन अंकी मराठी नाटक सदर केलं जाते. 

साधारण फेब्रुवारी महिन्यापासून दिग्दर्शक गौतम करंदीकर यावर्षी कोणतं नाटक सादर करणार याची जोरदार चर्चा ब्लुमिंग्टन् नॉर्मल मध्ये असते. विशेष सांगायचं म्हणजे ऐकून नवल वाटेल पण फक्त मराठी भाषिकच नव्हे तर अमराठी भाषिकही ह्या चर्चेत सामील असतात, शिवाय नाटक  बघण्यासाठीही  उपस्थिती लावतात.    

दिनांक २५ मार्च २०१२ रोजी   Blooming Grove च्या सभागॄहात मंडळातर्फे सचिन मोटे लिखित  'रिमोटकंट्रोल'  हे नाटक सादर करण्यात आले. या वर्षीचे हे नाटक तसं  अलीकडच म्हणजे २००८ मध्ये मुंबईत प्रदर्शित झालेलं आणि त्यामुळे नाटकाचा विषयही तसा नवीन आणि जिवंत!.

मिडिया हे प्रभावी माध्यम आहे हे तर खरेच पण त्याच बरोबर मिडिया कितपत विश्वासार्ह आहे हाही खर तर एक प्रश्नच आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांची वागणूक कशी असते, हे आता सगळ्यांना माहीत झाले आहे. दिवसभर एकच बातमी सांगणे, ती ही पराचा कावळा करून सांगणे, क्वचित् आपली पोळी भाजून घेणे, पक्षपाती Reporting करणे हे प्रकार सर्रास चालू असतात. सदर नाटक नेमके याच विषयाला हात घालते. 

'रिमोटकंट्रोल' चा विषय तशी एक प्रेमकहाणी पण त्यात नेहमीचा टिपिकल रोमान्स किवा फार्स मात्र नाही पण तसं नाटक खूप धीरगंभीर ही नाही. थोडा तणाव, थोडा विनोद, थोडा सस्पेन्स, थोडं  नाट्य  अस सर्व नात्याभावांचे यथायोग्य मिश्रण असलेल्या या नाटकाचे कथानक पुढीलप्रमाणे -

सुखी बर्वे दांपत्यांचा एकुलता एक मुलगा अभि जो  पुण्यात  शिकत असतो, तो अचानक एका रात्री पुण्याहून मुंबईला आपल्या घरी येतो. घरी पोहचण्याच्या पूर्वीच त्याचा एक मित्र शौकत  आणि बुरखा घातलेली एक मैत्रीण त्या घरात पोहचतात. ’तारा' ची ओळख करून देण्यासाठी शौकत तिला बुरखा  उतरवायला  सांगतो आणि आता इथे काही धोका नाही अस खात्रीपूर्वक सांगतो. अभिच्या आईवडिलांना  अभिची मैत्रीण अशी ताराची ओळख करून देतो व अभि  आल्यावर सर्व सांगेलच अस सांगून गप्प होतो. अचानक घडलेल्या या प्रसंगाने बर्वे दांपत्य कोड्यात पडलेले  असतात तेव्हाच अभीचा परत फोन येतो. शौकत, तारा आणि अभिच्या फोन संभाषणावरून अभीच्या आईवडिलांना (सौ मानसी बर्वे व मुकुंद बर्वे) कळत की तारा घरातून पळून आपल्या घरी लग्न करण्याकरिता आली आहे. अभिने आपल्याला न विचारताच हे पाऊल उचललं अस तर्क केल्याने त्यांना पहिला धक्का बसतो. थोड्याच वेळात अभि घरी येतो आणि त्याच्या पाठोपाठ त्याचा आणखीन एक मित्र 'बल्लू' ही घरी पोहोचतो. तो येताच अभि खरा प्रकार सांगतो की बल्लू आणि ताराच्या घरून विरोध असल्याने  लग्न लावण्यासाठी अभि त्यांना आपल्या घरी घेऊन आला आहे. हे समजल्यावर वातावरण एकदम निवळत. ते तणावयुक्त क्षण आनंदात पालटतात आणि  शेरोशायरी, नाच-गाण्यात  रात्र ओसरते.  

दुसऱ्या दिवशी सर्व लग्नाच्या तयारीला लागतात. अभिच्या ग्रुपमधली आणखीन एक मैत्रीण तन्वी लग्नासाठी हारतुरे घेऊन तिथे पोहचते. आता फक्त भटजी येण्याचाच अवकाश असतो  इतक्यात अचानक एक सीबीआय ऑफिसर प्रताप निंबाळकर अचानक घरात  येऊन  धडकतो आणि नाटक दुसर धक्कादायक वळण घेते. अभि आणि कंपनी कसे बसे बल्लू आणि ताराला लपवतात आणि क्षणापुरते त्या दोघांना वाचवतात. पण काही काळातच हे उघड होते की ताराचे वडील हे बिहारचे मोठे मंत्री असतात आणि राजकीय कारणास्तव त्यांचा या लग्नाला विरोध असतो त्यामुळे ते बर्वेंच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लावतात. अभि आणि कंपनी बल्लू आणि ताराला पोलिसांच्या तावडीतून वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतात पोलिसांकडून नाकाबंदी झाल्यावर दूरदर्शन - मीडियाची मदत घेण्याचा प्रयत्न करतात. वाहिन्या, राजकारणी व पोलीस यांच्या राजकारणात दोन प्रेमी  जिवांची  मात्र  केविलवाणी ससेहोलपट  होते.

अशाप्रकारे सामाजिक विषय हाताळलेल हे नाटक कुठे तणावयुक्त रटाळ न होता एक विलक्षण वेगाने पुढे सरकत राहते. प्रत्येक प्रसंगातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत नेण्यात दिग्दर्शक गौतम करंदीकर खूप यशस्वी झाले आहेत.प्रेक्षक अगदी सरसावून आता कोणत वळण म्हणून उत्सुकतेने खिळून राहतात.नाट्यदिग्दर्शना बरोबरच नाटकाची जमेची बाजू म्हणजे नाटकातील पात्रांचा उत्कृष्ट अभिनय.

वडिलांच्या विरोधाला न जुमानता धाडसाने घर सोडणारी धीट पण आईच्या आठवणीने गहीवरणारी 'तारा' ही व्यक्तिरेखा 'अमृता टिळेकर' ने चोख रंगवली आहे. 

उमदा , धाडसी, रांगडा  पण प्रेमात पडलेला 'बल्लू’, स्वप्नील राऊत' ने छान उभा केला आहे. त्याच अमराठी दिसणं, चालण, नाचणं  रंगमंचावर वावरणं, शायरी करणं आणि अस्सल हिंदी संवाद याने तो मराठी असूनही बिहारी वाटतो. नाटकात तारा आणि बल्लू हे दोघेही बिहारी दाखवल्याने त्यांचे संपूर्ण सर्वांशीच संभाषण हिंदीत होत आणि दोघांनीही कुठेही मराठी टाईप हिंदी न बोलता एकदम अस्सल हिंदी संवाद बोलतात. 

'शौकत' च्या भूमिकेत होता 'पराग काजरोळकर' खरतर नाटकातील ही भूमिका सहाय्यक पात्राची. त्यामुळे संवाद जास्त नसले तरी शौकत सहाय्यक भूमिकेत असल्याने बहुतांशी  प्रसंगात होता. संवाद नसतानाही बऱ्याच वेळा केवळ मूक अभिनयाने प्रसंगाची गंभीरता परागने उत्तम दर्शविली आहे. शौकत च्या भूमिकेशी संपूर्ण समरस झालेला पराग, पराग वाटतच नाही, इतका यथायोग्य शौकत त्याने साकारला आहे.  

'अभि' ची भूमिका पार पडली होती 'अनिरुद्ध गोडबोले ने' अनिरुद्धचा अभिनय नेहमीच सहजसुंदर असतो.विशेषतः शेवटच्या सीनमध्ये त्याने विलक्षण प्रभावी अभिनय करून नाटकाचा शेवट उठावदार केला आहे.          

सीबीआय ऑफिसर प्रताप निंबाळकरच्या भूमिकेला अगदी योग्य व्यक्तिमत्व असलेल्या 'रोहन नाईक'ने खराखुरा सीबीआय ऑफिसर वठवला आहे. रोहनची संवादफेक एकदम जबरदस्त. एकंदरीत त्याचा रंगमंचावरचा वावर CBI ऑफिसरला साजेसा.  

शौकत प्रमाणे सहाय्यक पात्राची भूमिका  होती तन्वीची. इतरांप्रमाणे तन्वीही पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे  दबावाखाली  असताना प्रसंगावधान राखून बऱ्याच वेळा तारा आणि बल्लुला वाचवण्याचा प्रयत्न करते. तन्वीच्या चुणचुणीत भूमिकेत होती मुक्ता कुलकर्णी. मुक्ताने आपल्या मोकळ्या अभिनयाने छान साथ दिली आहे.

मानसी व मुकुंद बर्वे दांपत्याच्या भूमिकेत होते गौरी गौतम करंदीकर. सर्वसाधारण पणे प्रेक्षकांना हसवून टाळ्या घेणे सोपे असते पण   गौरी करंदीकर रडूनही प्रेक्षकांच्या टाळ्या घेतात.नाटकातील काही थरार प्रसंग गौरी करंदीकर यांनी आपल्या कसदार अभिनयाने समर्थपणे पेलले आहेत.त्यातला विशेष लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे मुकुंद बर्वेंचा काहीच पत्ता लागत नसतो,आणि मानसीची ( अभिची आई ) अस्वस्थता शिगेला पोहोचत असतानाच अचानक फोन येतो आणि मी बरा आहे काळजी करू नकोस असे मुकुंद बर्वेचे शब्द कानावर पडताच मानसी शांत होते ना होते तोच बंदुकीच्या गोळ्यांचा आणि किंकाळंण्याचा आवाज येतो आणि फोन कट केला जातो. त्या आवाजाने प्रत्यक्ष काय घडल असेल  या कल्पनेनेच सर्वांच्याच काळजाचा थरथराट होतो .हा थरार गौरी करंदीकरांनी अप्रतिम सादर केला आहे.        

दिग्दर्शक गौतम करंदीकरांच दिग्दर्शनाबरोबरच अभिनय कौशल्यही वाखाणण्याजोग आहे. बल्लूच्या लग्ना निमित्त शेरोशायरी करून सर्वांबरोबर नाचगाणी करणारे मुकुंद बर्वे, पोलिसांबरोबर एक दिवस राहून परत आल्यावर आंतरबाह्य प्रचंड घाबरलेले बर्वे ,आणि आपण पोलीसखाते, राजकारणी यांच्या यंत्रणेत चिरडले जाणारे सामान्य जन आहोत या जाणीवेने हताश झाले असतानाही अभिच्या निर्णयामागे खंबीर उभे राहून तारा व  बल्लुला सहाय्य करणारे अभिचे वडील अशा अभिनयाच्या विविध छटा गौतम यांनी उतमरीत्या  सादर केल्या आहेत.

या नाटकाची अजून एक उजवी बाजू म्हणजे नाटकाचे पार्श्वसंगीत. यासाठी आशीष डहाके यांचे विशेष कौतुक. या नाटकात तसे बरेच प्रसंग होते जिथे दोन्हीही बाजूने फोन संभाषण होते तसेच टिव्ही news अशी विविधता. या सर्व तांत्रीक गोष्टी त्यांनी कौशल्याने सांभाळल्या त्यामुळे पार्श्वसंगीत /ध्वनी विशेष प्रभावी झाले.

या नाटकात कथेच्या मागणी नुसार एक बेडरूम, बाथरूम दरवाजा अशा नावीन्यपूर्ण मांडणी होती ते काम नेपथ्य टीम ने चोख बजावले होते. 

प्रकाश योजना गणेश भदाणे, दीपक टिळेकर. अचुक प्रकाश योजनेनी प्रसंग अधिक उठावदार झाले  
नेपथ्य अनुप तापकीर, मंदार कुलकर्णी, विनोद म्हसे, गणेश भदाणे, दीपक टिळेकर
विशेष सहाय्य शानू नाईक, कविता गोडबोले, श्रीकांत गोडबोले, मंदार कुलकर्णी, ज्योस्ना काजरोळकर, अभिजित कर्णिक, सोनाली कर्णिक, निलेश ताम्हाणे, निनाद वैद्य,नवीनकुमार भट, उत्तम नाईक, पुनीत दुबे
कार्यक्रम व्यवस्थापक विनोद म्हसे, श्वेताश्री म्हसे
पाडवा गुढी प्राची परांजपे
तिकिट्विक्री उदय परांजपे, नितीन महाजन 
बेबी सिटिंग रेखा गायकवाड, रश्मी गोखले
अल्पोपहार व्यवस्था रश्मी गोखले, तरुण देवांगण, सीमा मोटवानी, आनंद आणि अनन्या रोटकर 
फोटोग्राफी सागर पाटील,उमेश बिहाणी
व्हिडिओ शुटींग अनंत गोखले, संकल्प कळमकर
ध्वनीव्यवस्था मोहित पोतनीस

 

आश्लेषा राऊत

धन्यवाद
ब्लुमिंग्टन—नॉर्मल मराठी मंडळ

नाटक फोटो

नाटकाचे पोस्टर     


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००