कार्यक्रम २००८ - पाडवा


गुढीपाडवा! ब्लुमिंग्टन नॉर्मल मधील मराठी जाणकार रहिवासियांना गुढीपाडवा या सणाचे सांस्कृतिक आकर्षण म्हणजे मराठी मंडळातर्फे होणारे तीन अंकी मराठी नाटक। गेल्या ८ वर्षांची प्रथा याही वर्षी चालू राहिली। या वर्षीचे नाटक होते रत्नाकर मतकरी लिखित आणि गौतम करंदीकर दिग्दर्शित, 'कार्टी प्रेमात पडली.'

एप्रिल ५, २००८ रोजी ब्लुमिंग्टन हायस्कूल मधे हे नाटक सादर करण्यात आले . नाटयगृहाच्या प्रवेशद्वारात अनुजा दुर्वास यांनी गुढी उभारली होती. सर्व प्रेक्षकवर्गही आवर्जून भारतीय पद्धतीच्या पोशाखात नाटक बघायला आल्यामुळे उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

सुरुवातीला कार्यक्रमाचे मुख्य संचालक सुदर्शन पलांदे यांनी सर्व प्रेक्षकांचे स्वागत केले आणि मंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. नाटकाच्या परंपरेप्रमाणे तिस-या घंटेनंतर नाटकाचा शुभारंभ झाला आणि तीनही अंक संपेपर्यंत फार्सिकल, विनोदी अशा या नाटकाने प्रेक्षकाना पोट दुखेपर्यंत हसविले.

सदु आणि सोनाली यांची ही प्रेमकहाणी. सोनालीच्या आईचा म्हणजे चन्द्रिकाबाईंचा याला विरोध. त्यांना सोनालीचे लग्न श्रीमंत रविकिरण बरोबर करून द्यायचे आहे. सदुचा मित्र लोकनाथ लुकतुके हा 'सुखाचा मार्ग' या नावाचे सल्ला केन्द्र चालवितोय. सदु आणि सोनालीच्या प्रेमातलग्नात काय काय अडचणी येतात आणि लोकनाथ त्यातून कसा मार्ग काढतो हे या नाटकाचे मूळ कथानक. यात कविता करायला शिकायला येणारा इन्स्पेक्टर आहे, सदुच्या घरी वरकाम करणारा पण एकेकाळचा अट्टल चोर गजा आहे, गजाची पाकिटमार मैत्रीण माला आहे, भविष्य सांगणारी ब्रम्हकुमारीदेवी आहे , सोनालीचे वरवर भोळे वाटणारे वडील आप्पाराव आहेत आणि या सगळ्याला रत्नहाराच्या चोरीच्या रहस्याचे उपकथानक आहे. एकूण तीन तास प्रेक्षकाना खिळवून ठेवणारे असे हे रंगतदार नाटक!

लोकनाथ लुकतुके ही नाटकाची मध्यवर्ती भूमिका योगेश सावंत यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने सुरेख वठविली होती. अनिरुद्ध गोडबोले यांनी प्रेमात पडलेला नायक सदु मस्त रंगविला होता. त्यांचा सेन्स ऑफ टायमिंग जबरदस्त. त्यांना अप्रतीम साथ लाभली होती नायिकेच्या भुमिकेतल्या भार्गवी रामदासी यांची. या दोघांनी आपल्या भूमिका झकास सादर केल्या. ख़ास करून त्यांचे हिन्दी गाण्यावरील नृत्य तर लाजबाब होते. आप्पाराव वाडकरांच्या भूमिकेत होते प्रसन्न माटे. यांनी अगदी अस्सल कोकणातला मराठी माणूस हुबेहूब उभा केला. माटेना प्रे़क्षकानी अगोदरच्या मंडळाच्या नाटकातही पाहिले आहे. पण या नाटकातली त्यांची भूमिका सर्वात उत्तम ठरावी. गौरी करंदीकरांनी नेहेमीप्रमाणे त्यांच्या कसलेल्या अभिनयातून चंद्रिकाबाईंचे पात्र एकदम ठसक्यात सादर केले. श्रीकांत नरसाळे यांनी वठवलेला नोकर गजा छोट्याशा भूमिकेतही छाप टाकून गेला. सोनली पाटील यांनी पाकिटमार मालाच्या चुणचुणीत भूमिकेतून थरार आणला. व्यक्तिमत्वाला साजेशी असणारी इन्स्पेक्टरची भुमिका निनाद वैद्य यांनी विनोदी झलक ठेवत सादर केली. दुस-या अंकात एंट्री घेउनही मधुरा निमदेव यांनी साकारलेली ब्रम्हकुमारी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहून गेली. रत्नपारखीच्या भुमिकेत केदार भागवत यांनी आपल्या विनोदी संवादांनी प्रेक्षकांच्या भरपूर टाळ्या मिळवल्या.

रत्नाकर मतकरींच्या या नाटकात दिग्दर्शक गौतम करंदीकर यांनी अतीशय सूचक असे फेरफार करून या नाटकात अधीकच मजा आणली आणि म्हणूनच नाटक उत्तरोत्तर रंगतच गेले. कुठलेही नाटक रंगत जाणे हे जितकं त्यातील अभिनय करणा-या पात्रावर अवलंबून असतं तितकंच किंवा त्याहूनही जास्त श्रेय दिग्दर्शकाकडे जाते. गौतम करंदीकरांनी आपल्या वैशिष्ठपूर्ण व प्रभावी दिग्दर्शनाने संपूर्ण नाटक कुठेही संथ न होऊ देता , उत्कृष्ठरित्या सादर करत प्रेक्षकांचे खरेखुरे मनोरंजन केले. त्यांनी प्रसंगानुरुप टाकलेली हिंदी नृत्यगीते तर नाटकाला सोन्याचा कळस चढवणारी होती.

या नाटकातील तांत्रिक बाजूही साजेशा आणि उठावदार होत्या. पार्श्वसंगीत होते समीर चौबळ यांचे. नृत्यदिग्दर्शिका होत्या भार्गवी रामदासी. नितिन महाजन यांनी प्रकाशयोजना सांभाळ्ली होती तर नेपथ्यकार होते जयेश मोहिते, अमित मनोहर, रोमेल पारसनीस आणि विनोद म्हसे. विशेष सहाय्य लाभले होते आदिती साठे, भवानीप्रसाद रामदासी, शैलजा शिरसाळकर व उत्तम नाईक यांचे.

मध्यंतरात मंडळातर्फ़े स्वादिष्ट सामोसे व मॅंगो फ़्रुटी या अल्पोपहाराची सोय केली होती. हा अल्पोपहार देण्याचे काम सुदर्शन पलांदे, साईष प्रकाश, अतुल नेवसे, मयुरेश देशपांडे, गौरव चौक, प्रसाद अथणीकर, सचिन बुचे, राहूल झगडे, अभि शेंडे, बाळक्रुष्ण कामत व सुनील मुंडले यांनी केले होते.

या वर्षी ३०० हून अधिक तिकिटविक्री करणारी मंडळी होती कुणाल लाड, समीर बेंद्रे, चंद्रजीत पाटील, अनंत गोखले, नितिन महाजन, योगेश सावंत, सचिन टकले, मानसी रक्षे, सुनील मुंडले, प्रसाद अथणीकर, अतुल नेवसे, अमीत मनोहर, अभि शेंडे, पल्ल्वी मुंडले व निवेदिता कुळ्कर्णी.

नाटकाचा विनाअडथळा मनमुराद आनंद लुटण्यासाठी बेबीसिटिंगचे व्यवस्थापन आदिती साठे, सोनली परांजपे, वेदा गोखले, सोनल पाटील, अश्विनी देशपांडे, प्राची परांजपे, अजिता खांडेकर, अनुजा दुर्वास, लीना ठोंबरे, तेजस्विनी बुचे, मानसी बाजवाला आणि शशीताई कुळ्कर्णी यांनी पाहिले.

सुशील कांबळे, विश्वनाथ पाटील व समीर दंडगे यांनी व्हिडीओ रेकोर्डिंग केले तर रोहन गुर्जर आणि सिध्दार्थ वराडकर यांच्याकडे फोटोग्राफ़ीची जबाबदारी होती.

नाटक संपल्यावर गौतम करंदीकरांनी रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील सर्व कलाकारांचा परिचय करून दिला.

ब्लूमिंग्टन व्यतिरिक्त सेंट लुईस येथेही या नाटकाचा यशस्वी प्रयोग झाला. परंतु ब्लुमिंग्टनमधल्या प्रयोगाचे ठळक वैशिष्ठ म्हणजे आतापर्यंत मंडळातर्फ़े सादर झालेला हा २५ वा (रौप्यमहोत्सवी) प्रयोग. या भरीव कामगिरी बद्दल दिग्दर्शक गौतम करंदीकर आणि नाटयसंघाचे हार्दिक अभिनन्दन!

- आश्लेषा राऊत.
नाटकाचे पोस्टर      नाटकाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००