कार्यक्रम २००५ - पाडवा


पाडवा म्हणजे मंडळाचे नाटक ही प्रथा यशस्विरीत्या चालू ठेवत व २००४ मध्ये सादर केलेल्या ' ऋणानुबंध ' च्या तुफान यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांना समर्थपणे पुरे पडत यावर्षीही श्री. गौतम करंदीकरांनी आपल्या दिग्दर्शनाच्या ताकदीची झलक दाखवत श्री. अजित दळवी लिखित, ’ डॉक्टर तुम्ही सुद्धा...? ’ हे गंभीर, सामाजिक प्रश्न असलेले तीन अंकी नाटक यशस्विरीत्या सादर केले.

हे नाटक डॉक्टर व पेशंट मधील भावनिक-व्यावहारिक नात्यांचे, डॉक्टरांचा पोटभरू दृष्टिकोन, निती-चाड-बांधीलकी या शब्दांशी संपूर्ण फारकत घेतलेली वर्तणूक तसेच पेशंटचेही अनेक नमुने, सौदेबाजी, असहाय्यता व अजूनही जगात काही सत्याने चालणारे, तत्त्वांसाठी प्रसंगी आपल्या माणसांशी वैर पत्करून परक्याच्या मागे उभे राहणारे लोकही आहेत, अशा अनेक भावांमधून उलगडत जाते.

डॉ. वैदेही पटवर्धन यांचे अतिशय नावाजलेले मॅटर्निटी होम असून, डॉ .वैदेही एक अतिशय प्रतिथयश गायनॉकॉलॉजीस्ट आहेत. त्यांनी मेहनतीने व स्वत:च्या निदान कौशल्याने लोकांचा विश्वास मिळवलेला असतो. डॉ. अविनाश पटवर्धन हे त्यांचे पती. संपूर्ण पंचक्रोशीत सर्जन म्हणून त्यांचा हात धरणारे कोणीही नाही असा नावलौकिक असूनही सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये प्रोफेसर आहेत. खाजगी प्रॅक्टीसमधील गल्लाभरू ऍप्रोच न सोसून व स्वत:ची तत्त्वे याकरिता खाजगी प्रॅक्टीस करत नाहीत. डॉ. शिरीष पेंडसे हा एक उमदा व अतिशय हुशार-प्रॅक्टीकल डॉक्टर वैदेहीच्या बरोबर तिच्या हॉस्पिटल मध्ये असतो. शिरीष म्हणजे जे हवे ते येन केन प्रकारे मी मिळवेनच आणि सतत पुढे प्रगतीच्या दिशेने जात राहीनच हा दृष्टिकोन असणारा होतकरू महत्त्वाकांक्षी डॉक्टर. डॉक्टर लोकांची आजकाल चाललेली मनमानी, लोकांना उल्लू बनविणे याची उदाहरणे देत कशी गंमत चालते हे सांगणे व मजा घेत हसणे, त्यात काही गैर आहे असे न वाटणे. पंचतारांकित हॉस्पिटल काढण्याचे त्याचे स्वप्न वैदेहीला हाताशी धरून पूर्ण करून घेण्याची त्याची धडपड चाललेली असते.

नाटक सुरू होते आणि शिरीष महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन येतो. वैदेहीच्या नवीन हॉस्पिटलसाठी पन्नास लाखांचे लोन मंजूर झाले. अद्यावत हॉस्पिटल बांधावे हे वैदेहीचे स्वप्न असते. लोन ऑफिसर लागणारे लोन मंजूर करत नसल्याने अस्वस्थ वैदेही या बातमीने आनंदून जाते. तो तमिळ ब्राम्हण मला व अविनाशना बधला नाही तो तुला कसा रे बधला शिरीष? या वैदेहीच्या प्रश्नावर शिरीषचे ' व्हिटॅमीन एम ' हे कधीही व कुठेही काम करतेच. तसेच हे लोन फेडण्याकरिता दरमहा सहासात सिझेरीयन्स व पाचसहा हिस्ट्रोक्टॉमी हे व्यावहारिक उत्तर वैदेहीला कुठेतरी खटकले तरी हॉस्पिटलच्या नादात ती दुर्लक्ष करते. डॉ. गोखले, अस्थितज्ञही यात सामील असतात. आता या नवीन हॉस्पिटलमध्ये अविनाशसरांना ही गुंतवावे म्हणजे मग हॉस्पिटलला मागे वळून पाहावेच लागणार नाही हे शिरीषचे मनसुबे अविनाश ठाम नकार देऊन हाणून पाडतो. लायन्स क्लब तर्फे सोशलवर्क म्हणून आयोजीत ऑर्केस्ट्रा पाहायला वैदेही, शिरीष व गोखले जातात आणि एक पेशंट अचानक हॉस्पिटलमध्ये येते.

वैदेही नसल्याने व ती अविनाशला भेटायचे असे म्हणत हटून बसल्याने सोमनाथ तिला अविनाशकडे घेऊन येतो. रत्ना पवार ही गेले काही महिने वैदेहीकडे मूल व्हावे यासाठी उपचार करवून घेत असते. निराश झालेली रत्ना मुंबईहून एक प्रसिद्ध डॉक्टर आलेत म्हणून त्यांच्याकडे सेकंड ओपिनीयन घ्यायला जाते. तर ते," तुम्हाला गर्भाशयच नाही तर मूल होणारच कसं " असे विचारतात. हे ऐकून धक्का बसलेल्या अवस्थेत रत्ना अविनाशसमोर येते. आजवर अनेक डॉक्टरांना दाखवले, डॉ. वैदेही व शिरीष पेंडसेही कधीही म्हणाले नाहीत की मला गर्भाशय नाही म्हणजेच मी येथे येईस्तोवर मला गर्भाशय होतं मग आता ते कुठे गेलं? माझी ट्यूब टेस्ट केली तेव्हा काहीतरी चूक झाली असेल अन ते काढून टाकलं असेल. चूक केली वर ती मला सांगितलीही नाही. आता ती चूक लपविण्याकरिता अजूनही माझ्यावर उपचार करत आहेत. माझ्या भावनांशी खेळत आहेत. मी फसवले गेले आहे व मला याची नुकसान भरपाई मिळायलाच हवी असे सांगून रत्ना निघून जाते. हे सगळे ऐकून अविनाशला धक्का बसतो. तो हॉस्पिटलच्या रेकॉर्डमधून नेमकी रत्नाची फाइल शोधून काढून स्वत:जवळ ठेवतो.

ऑर्केस्ट्रावरून मजेच्या मूडमध्ये आलेल्या वैदेही व शिरीषला रत्ना आल्याचे व तुम्ही तिला फसवल्याचे फाइल्सवरून स्पष्ट दिसते आहे हे सांगून मी उद्या चार वाजता तिला बोलावले आहे तेव्हा वैदेही आता हे नुकसान कसे भरून काढणार हे मला सांग हा प्रश्न अविनाश वैदेहीला विचारतो. त्यावर शिरीष म्हणतो, " त्यात काय, देऊ की नुकसान भरपाई. चांगली पाचसात हजार देऊ. " हे ऐकल्यावर, " एका बाईला आई होण्यापासून वंचित करता वर तिला ते सांगतही नाही याची नुकसान भरपाई इतकीच?" असे विचारत अविनाश वैदेहीला, " तुम्ही आपली चूक कबूल करून त्या दोघांचे समाधान होईल इतकी नुकसान भरपाई द्यावी असा अल्टीमेट्म देतो. " दुसऱ्या दिवशी चिडलेला रत्नाचा नवरा हॉस्पिटलमध्ये येऊन दंगा करतो व आलेल्या पेशंटना पळवून लावतो. त्याला डॉ. अविनाश जरब दाखवून गप्प करवतात व वैदेहीच्या केबिनमध्ये घेऊन जातात. नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण किती मिळायला हवी- मोठे हॉस्पिटल, पैसा, समाजातील प्रतिष्ठा यांना घाबरून व स्वत:ची चूक असल्याने डॉक्टरीण बाईंकडून पैसा उकळू असा रत्नाच्या नवऱ्याचा प्रयत्न असल्याने त्याचे एक लाख रुपये मागणे, शिरीषचे त्याच्याबरोबर अरेरावीने वागणे व त्याला दमात घेऊन घासाघीस करणे, वैदेहीचा चूक झाली असूनही ती न मानण्याचा प्रयत्न याने संतापलेली, दुखावलेली रत्ना एकदम मला नुकसान भरपाई म्हणून डॉ. वैदेही यांनी स्वत:चे गर्भाशयच द्यावे असा पवित्रा घेते व त्या धक्क्यात सगळे असताना पहिला अंक संपतो.

दुसऱ्या अंकाची सुरवात होते तीच मुळी रत्नाने वैदेहीला कोर्टात खेचलेले असते. रत्नाच्या या धोरणामुळे व आता गर्भाशय तर गेलेच आहे निदान पैसे तरी मिळाले असते तर तेही नाहीत म्हणून चिडलेला नवरा रत्नाला सोडून देतो-घराबाहेर काढतो. या खटल्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे वैदेहीच्या प्रॅक्टीसवर, तिच्या नावामुळे येणाऱ्या पेशंटवर परिणाम होतो. लोनचे हप्ते वेळेवर न देता आल्याने हॉस्पिटलचे काम बंद पडते. ते सुरू व्हावे यासाठी शिरीषचे नीतीला-एथिक्सना सोडून चाललेले प्रयत्न. अविनाशने आपल्याविरुद्ध कोर्टात साक्ष देऊ नये याकरिता वैदेहीचे अविनाशला मनवण्याचे प्रयत्न. परंतु अविनाश त्या प्रयत्नांना बधत नाही यामुळे होणारी वैदेहीची अगतिकता व दोघांच्या संबंधात निर्माण झालेली दरी. शिरीन पटेल या वैदेहीच्या अतिशय जुन्या पेशंटला शिरीषने तुला कॅन्सर असू शकेल असे सांगून बायोप्सी करावयास लावणे. जर उद्या कोर्टाने गर्भाशया बदली गर्भाशय द्यावे असा निर्णय दिलाच तर शिरीनला ग्रोथ मॅलिग्नंट आहे असे सांगून तिचे गर्भाशय काढून रत्नाला द्यायचे आणि तसा निर्णय न दिल्यास नंतर ती ग्रोथ मॅलिग्नंट नव्हती असे शिरीनला सांगून तिला आनंद मिळाला का नाही ही अशी वर मखलाशी करणे. काढून टाकलेल्या मृत अर्भकांच्या रक्तामासाचा गुलाबाच्या खतांसाठी म्हणून विक्रय करणे. हे सारे वैदेहीला कळल्याने धक्का बसलेली व खुद्द अविनाशच रत्नाच्या मागे आपल्या विरुद्ध उभे राहिलेले पाहून कोलमडलेली वैदेही. स्वत:चा मुलगा मोठा असून आता पुन्हा मूल नको आहे तरीही स्वत:चे गर्भाशय रत्नाने मागताच हबकलेली वैदेही. या साऱ्यात दुसरा अंक संपतो.

तिसऱ्या अंकात केस सुरू असतानाच वैदेहीचे रत्नाच्या नवऱ्याने पळवून लावलेले एक जुने पेशंट स्वत:च्या मुलीला अगदी अडल्यावर घेऊन येतात. आधीच्या सगळ्या मुलींचे बाळंतपण वैदेहीने केलेले असूनही तिच्यावरचा विश्वास उडाल्याने इतर डॉक्टरांकडे नेऊन वेळ फुकट दवडतात. त्यामुळे शेवटी ते मूल मरते. या त्यांच्या अविश्वासाचे मूळ स्वत:त झालेला बदल आहे हे जाणवून वैदेही खचते. कोर्ट निकाल देते-अर्थातच रत्नाच्या बाजूने. गर्भाशया बद्दल गर्भाशय हे मान्य करण्यासारखे नसले तरी तुम्हाला हवी तितकी नुकसान भरपाई डॉ. वैदेहींकडे तुम्ही मागा असे कोर्टाने सांगितल्यावर रत्ना फक्त एक रुपया मागते. वर म्हणते की, " या अशा मुळातच गरीब असलेल्या डॉक्टरांना मी आणिक गरीब करू इच्छित नाही. माझा आई होण्याचा हक्कच ज्यांनी हिरावून घेतला त्यांना स्वत:चे आता उपयोगी नसलेले गर्भाशय द्यायला नकार असावा यातच सगळे आले. "

एकेकाळी पेशंटचे हित हेच सर्वस्व मानणारी वैदेही या मोठ्या हॉस्पिटलच्या स्वप्नाने शिरीषच्या नादाने डॉक्टरीच्या पेश्यासोबत येणाऱ्या मूलभूत शपथेलाच विसरून जाते. अविनाशला हे सगळे असह्य होऊन खटला संपताच पत्रकारांना मुलाखत देऊन तो तिथेच मेडिकल कॉलेजच्या नोकरीचा राजीनामा देऊन खेड्यापाड्यात जाऊन जनजागृती करायचे ठरवतो. लोकांनी स्वत:च कसे जागृत राहावे, डॉक्टर सांगेल ते आंधळेपणे न करता समजावून घेऊन करावे. यासाठी स्वत:ला वाहून घ्यायचे ठरवून घर सोडतो. शिरीषची वृत्ती आपल्याला न झेपणारी व पटणारी आहे हे समजल्याने वैदेहीने शिरीषला दिलेला निरोप. इतके राबून-कष्ट करून एवढे यश मिळवले हा डोलारा उभा केला आणि आता तुम्ही मलाच जायला सांगता यामुळे फ्रस्ट्रेट झालेल्या-संतापलेल्या शिरीषचे, " अरे शहरात जाऊन मोठ्ठा डॉक्टर होऊनच दाखवेन " असे म्हणत तणतणत निघून जाणे. शेवटी स्वत:ची चूक उमगलेली-मान्य असलेली, अविनाशची साथ हवी असली तरी त्याचा दृष्टिकोन संपूर्णपणे पटलेली वैदेही पुन्हा एकदा पूर्वीसारखेच चांगले नाव मिळवेनच या जिद्दीने प्रेरित होऊन दवाखान्यात जाते आणि नाटक संपते.

वैदेही, शिरीष, रत्ना आणि अविनाश या नाटकातील प्रमुख भूमिका. डॉ. वैदेहीची भूमिका सौ. गौरी करंदीकर यांनी समर्थपणे केली आहे. स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी व शिरीषच्या प्रॅक्टीकल ऍप्रोचच्या विचारसरणीनुसार वागणारी वैदेही, एकीकडे रत्नाच्या या वेदनेला आपण कारण आहोत परंतु उघडपणे ती चूक मानण्यास तयार नसणारी वैदेही, खुद्द अविनाश आपल्या विरुद्ध उभे राहणार याने कोलमडलेली वैदेही व शेवटी ही हार पचवून पुन्हा एकदा पूर्वीचीच वैदेही होऊन गेलेली प्रतिष्ठा मिळवेनच या जिद्दीने उभी राहिलेली वैदेही. या सगळ्या भावना गौरी करंदीकरांनी उत्कृष्ट्यरीत्या सादर केल्यात.

डॉ. अविनाश यांची अतिशय संयत, तत्त्वनिष्ठ, बुद्धिजीवी भूमिका श्री. नचिकेत सरदेसाईंनी समजून व नेमकी साकारली आहे. सुरवातीचे खेळीमेळीचे संवाद, नंतर रत्नाच्यावरील अन्यायात प्रत्यक्ष बायकोलाच जाब विचारणे, ठामपणे विरोधात उभे राहणे. डॉ. शिरीषच्या आग्रहाला तत्त्वांसाठी बळी न पडणे व शेवटी या डॉक्टरी पेश्याला धंदा बनवून पेशंटचा बळी घेणाऱ्या या भयानक सिस्टिम विरुद्ध जनजागृती करण्याचा निर्णय, यातील चढउतार अतिशय संयमाने सादर केलेत. आवाज व भावनांचा अचूक वापर करून नचिकेत सरदेसाईंनी डॉ. अविनाशची भूमिका अप्रतिम वठविली.

डॉ. शिरीष पेंडसे ही एकदम जोषपूर्ण व प्रॅक्टीकल भूमिका श्री. मयुरेश देशपांडे यांनी अत्यंत यशस्विरीत्या व दणकेबाज सादर केली. शिरीषचे बेरकीपण, महत्त्वाकांक्षेकरिता वाटेल ते करायची तयारी. रत्नाच्या नवऱ्याबरोबरची सौदेबाजी. प्रत्यक्ष रत्नालाच तुझ्याकडे काय पुरावा आहे असे उलट विचारण्याचा कावेबाजपणा. येन केन प्रकारे अविनाशसरांना या केसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. केस हरल्यावरही झालेली चूक मान्य न करण्याची, हात झटकून टाकण्याची वृत्ती. सुरवातीचे एकदम मोकळे-मजेचे संवाद व शेवटी वैदेहीने आपल्याला जा म्हणून सांगितले हा अपमान व इतकी वर्षे फुकट गेली आता पुन्हा नव्याने सुरवात करायला हवी यामुळे आलेले फ्रस्ट्रेशन अप्रतिम दाखवले आहे. मयुरेश देशपांडेनी साकारलेला डॉ. शिरीष जबरदस्त होता.

रत्ना पवारची भूमिका सौ दिपा जोशी यांनी खणखणीत वठवली आहे. मूल होत नाही यामुळे होणारे दु:ख-त्रासलेली रत्ना, फसवलो गेलो आहोत हे लक्षात आल्यावर पेटून उठलेली रत्ना, प्रसंग येताच नवऱ्याशीही झगडून स्वत:वरील अन्यायाविरुद्ध दाद मागणारी रत्ना व शेवटी वैदेहीलाच तू किती गरीब आहेस हे सुनावणारी रत्ना ताकदीने सादर केली आहे. पहिल्याच अंकातील प्रवेशाच्या प्रसंगातील रत्नाचे अविनाशला आपण कसे फसवले गेलोत हे तळतळून सांगणे, वैदेहीचे गर्भाशयच हवे हे ठासून मागणे व अग तू बाई असूनही तुला बाईची वेदना कळेना हे कळवळून विचारणे, हे सारे भाव अप्रतिम व्यक्त केले आहे. रत्नाच्या गावरान भूमिकेतील-भाषेचे बेअरिंग सौ.दिपा जोशी यांनी अचूक राखले. दिपा जोशींनी सादर केलेल्या रत्नाची वेदना प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत भिडली.

रत्नाच्या नवऱ्याची भूमिका श्री. विशाल डहाळकर यांनी पर्फेक्ट केली आहे. बायकोला गर्भाशयच नाही आता पोर कसे होणार? आपल्याला फसवले गेलेय याची प्रथम आलेली चीड, अपमान त्यातून केलेला आक्रस्ताळेपणा. नंतर गर्भाशय तर गेलेच आहे तेव्हा आता त्याबदली किती पैसा उकळू या सौदेबाजीत त्याचे झालेले रुपांतर, बोलाचालीत उतरलेले मवालीपण व दवाखान्यात केलेला राडा, हे सगळे विशाल डहाळकरांनी त्यांच्या देहबोलीतून व संवादाच्या फेकीतून उत्तम दाखवले आहे.

शिरीन पटेल या मध्यमवयीन पारशिणीची भूमिका सौ. अनुराधा गोरे यांनी मस्त केली आहे. पारशिणीचे लगबगीने चालणे, शब्दोच्चार, टिपीकल आग्रहीपण हे बेअरिंग पर्फेक्ट सांभाळत सौ. अनुराधा गोरे यांनी स्टेजवर पारशीण हुबेहूब उभी केली आहे.

डॉ. गोखले यांच्या भूमिकेत श्री. वासुदेव कारूळकरांनी थोड्या गमत्या टोनने, दवाखान्यातील रिसेप्शनिस्ट कविताच्या भूमिकेत सौ. वसुधा दवणेनीं, अगतिक बापाच्या भूमिकेत श्री. अजित खाडेनीं व सोमनाथच्या थोड्या मिश्किल व आज्ञाधारक भूमिकेत श्री. सुनील मुंडलेनीं योग्य साथ देऊन आपापल्या भूमिका उत्तम निभावल्यात.

या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी श्री. अनिकेत वैद्य, श्री. विनोद ठाकुर व श्री उत्तम नाईक यांनी दवाखाना व घर असे दोन्हींची अचूक मांडणी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट्य रित्या सांभाळली.

प्रकाश योजना होती श्री. राहुल शिंदेची व संगीत दिले होते श्री. आनंद पाध्ये यांनी. विशेष साहाय्य होते श्री. दिलीप पवार, श्री. विजय दवणे व शैलेश जोशी यांचे.

व्हिडिओ चित्रीकरण श्री.शशीधर वेंकट, श्री. चंद्रकांत धर्मे, श्री. सचिन अडबे व श्री. आनंद शिंदे यांनी केले. व या व्हिडिओ चित्रणांचे संकलन करून त्यातून उत्कृष्ट डीव्हीडी श्री. नचिकेत सरदेसाई यांनी बनविली.

' डॉक्टर तुम्ही सुद्धा...? ' हे व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेले व ज्वलंत सामाजिक प्रश्न छेडणारे नाटक श्री. गौतम करंदीकरांच्या अत्युत्तम दिग्दर्शन कौशल्यामुळेच यशस्विरीत्या सादर झाले. प्रत्येक कलाकाराला भूमिका समजावून घेऊन आधी तुम्ही ती करण्याचा प्रयत्न करा अशी लिबर्टी देऊन कलाकारांना स्वत:च्या भूमिकेशी समरस करण्याचा गौतम करंदीकरांचा नेहमीच प्रयत्न असतो. कलाकारांकडून हवे ते येईतो त्यांना मार्गदर्शन करून अथक परिश्रमाने प्रेक्षकांना अप्रतिम तेच सादर करण्याकडेच त्यांचा कल आहे. या नाटकाच्या यशाने गौतम करंदीकरांच्या कारकीर्दीत अजून एक मानाचे पीस खोवले गेले.

ब्लुमिंग्टन् नार्मल व्यतिरिक्त सेंट लुई आणि मिलवॉकी येथेही या नाटकाचे यशस्वी प्रयोग सादर झाले व तेथील प्रेक्षकांना अतिशय आवडले.

भाग्यश्री सरदेसाई.

नाटकाचे पोस्टर

कार्यक्रमाची छायाचित्रे