कार्यक्रम २००४ - पाडवा


ब्लुमिंग्टन नॉर्मल मराठी मंडळाच्या वतीने दरवर्षी आपण गुढीपाडव्यानिमित्त नाटक सादर करतो. यावर्षी सुप्रसिद्ध नाटककार मधुकर तोरडमल लिखित " ऋणानुबंध " हे मानवी मनाच्या निरनिराळ्या कंगोऱ्याचे विश्लेषण करणारे गंभीर, सामाजिक प्रश्नांचा माग घेणारे तीन अंकी नाटक दिग्दर्शक गौतम करंदीकर यांनी यशस्विरीत्या सादर करून एक नवीनच उंची गाठली.

तसे हे नाटक वाडा संस्कृती काळातले. घरातील कर्ता पुरूष हाच सर्वेसर्वा व तो म्हणेल तीच पूर्वदिशा. गावात अतिशय दबदबा असलेले नगरपालिकेचे अध्यक्ष तसेच अनेक बँका, सहकारी संस्थांच्या केंद्रस्थानी व कसलेले निष्णात वकील अप्पासाहेब मुजुमदार. यांच्या तोंडात सदैव विठ्ठलाचे नांव. त्यांची पंढरपुराची वारी कधीही चुकली नाही. सगळे काही पैशाच्या भाषेत तोलणारे अतिशय स्वार्थी, मुजोर असे जबरदस्त प्रस्थ. यांचे ब्रीदवाक्यच मुळी, " देताना कमीतकमी द्यावे जमल्यास काहीच देऊ नये मात्र घेताना जास्तीत जास्त घ्यावे जमल्यास सगळेच घ्यावे " हे असल्याने कधी धाकधपटशा तर कधी गोडीगुलाबीने आपला कार्यभाग साधणे हयात अप्पासाहेबांचा हातखंडा होता.

अप्पासाहेबांच्या घरात त्यांच्या सौभाग्यवती व तीन मुले. थोरला प्रदीप, मतिमंद व शरीराने अधू असल्याने घरातच असतो. मधला मुलगा विश्वास-नावाजलेला डॉक्टर असून गावातच त्याची उत्तम प्रॅक्टीस सुरू आहे. आणि शेंडेंफळ पमा. एमए झालेली दिसायला चांगली गुणी लेक. आता उपवर झाल्याने तिच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. शिवाय घरात एक लांबच्या नात्यातील विधवा काकूही आहे. बायको संधिवाताने आजारी असल्याने घरातला सगळा कारभार ही काकूच सांभाळते. आणि अप्पासाहेबांचा अतिशय विश्वासू कारकून जोशी हाही घरातलाच.

नाटकाची सुरवात होते तीच नाम:स्मरण सप्ताहाने. गेली पंधरावर्षे नेमाने आप्पासाहेब सप्ताहाचा घाट घालत व जेवणावळीने सांगता करत. अशिलाला अप्पासाहेब व कारकून जोशी कसे घोळात घेतात याची मस्त झलक रामराव येतात त्यावेळी पाहायला मिळते. हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे नवऱ्याला गमावून बसलेल्या व गर्भवती असलेल्या दु:खी अरुंधती सानेनी आप्पासाहेबांचे मोठे नाव ऐकून त्या बेजबाबदार डॉक्टरांना अप्पासाहेब नक्कीच धडा शिकवतील याची खात्री बाळगून केसचे वकीलपत्र दिलेले असते. अप्पासाहेबांच्या स्वार्थी वृत्तीचे निदर्शन करून तू सावध राहा असे खबरदार करणारे निनावी पत्र अचानक आल्याने गोंधळलेली अरुंधती ते पत्र घेऊन आप्पासाहेबांकडे येते. ह्या निनावी पत्राचा माग काढता काढता ते अक्षर आप्पासाहेबांना ओळखीचे वाटते व शेवटी ते पत्र आश्रित असलेल्या काकूंनीच लिहिले असल्याचे उघड होते. या घरात आश्रित असूनही प्रसंगी आप्पासाहेबांच्या धाकाला न जुमानता खमकेपणे उभे राहून आरेला कारे फक्त काकूच करू शकते हे जाणवते.

विश्वास कडून वैद्यकीय सल्ला घेतानाच अरुंधतीला विश्वासप्रती आदर वाटू लागतो. तर विश्वासला खात्री पटते की डॉक्टरांच्या चुकीमुळेच अरुंधतीच्या नवऱ्याचा मृत्यू झालेला आहे. तीन-चार वेळा ठरत आलेले लग्न मोडल्याने पमा दु:खी असते. पुन्हा एकदा तिला एक चांगले स्थळ सांगून येते. नाराज पमा फारशी उत्सुक नसते तशी तिला आई व काकू समजावून तयार करतात. मामा व भाचे येतात. प्रथमदर्शनीच पमा व मिलिंद भावे एकमेकांना पसंत करतात. आता पुढची बोलणी करावी असा विचार सुरू असतानाच अचानक प्रदीप तिथे येतो. अशा मतिमंद व अधू मुलाची माहिती तुम्ही आमच्यापासून लपविलीत असा आरोप लावून मामा भाच्याला घेऊन तरातरा निघून जातात. संतापलेले अप्पासाहेब काठीने प्रदीपला मारायला धावतात व त्याला वाचवायला काकू मध्ये पडते. इथेच पहिला अंक संपतो.

पत्रात लिहिल्याप्रमाणेच हॉस्पिटलच्या विरुद्ध चाललेल्या खटल्यात पाच लाख रुपये नुकसान भरपाई घेऊन तडजोड करण्याचा सल्ला आप्पासाहेब अरुंधतीला देतात. त्यामुळे अरुंधतीचा अप्पासाहेबांवरचा विश्वास उडतो व पत्रातील मजुकराची खात्री पटते. या केसमुळे अरुंधती व विश्वास एकमेकांच्या जवळ येतात. विश्वास तिला लग्नाची मागणी घालतो व आप्पासाहेबांच्या विरोधाला न जुमानता अरुंधतीशी लग्नही करतो. कारकून जोशींना सात मुली असतात व आठवे येऊ घातलेले असते. या ओझ्याखाली पिचलेले जोशी वेड्या प्रदीपच्या गळ्यात आपल्या मोठ्या लेकीला बांधावे असे मनसुबे रचत असतात परंतु विश्वास मात्र या प्रस्तावाला कडाडून विरोध करतो. आई, काकू व विश्वास सतत प्रदीपला अप्पासाहेबांच्या रागापासून जपत असतात. प्रदीपमुळे पुन्हा आपले लग्न मोडले याने अतिशय दुखावलेली पमा एक दिवस प्रदीपला घालून पाडून बोलते. अरुंधतीच्या बाळाजवळ प्रदीपला कोणीही जाऊ देत नसल्याने रागावलेला-दुखावलेला प्रदीप संधी मिळताच बाळाला पाळण्यातून उचलून घेतो व घाबरलेली, चिडलेली अरुंधती बाळाला घेऊन घर सोडून निघून जाते. पमाचे लग्न प्रदीपमुळे मोडले आणि त्यात अरुंधतीच्या घर सोडून जाण्याने चिडलेल्या व असाहाय्य झालेल्या काकूचा तोल ढळतो व ती प्रदीपला बदडत असतानाच दुसरा अंक संपतो.

तिसऱ्या अंकात आप्पासाहेब-विश्वासची, " झोपेच्या गोळ्या देऊन प्रदीपला कायमचे संपवून टाक- मी नगरपालिकेचा अध्यक्ष आहे पुढचे मी पाहून घेईन " यावरून झालेली टसल, अरुंधतीचे बाळाला घेऊन स्वगृही येणे, मामा-भाचे यांचे पुन्हा आगमन होऊन पमाचे लग्न ठरणे व आप्पासाहेबांचे अत्यंत इमानी कारकून जोशी यांनी संधी मिळताच आप्पासाहेबांना कोंडीत पकडणे. तसेच प्रदीप गेला हे कळताच काकूने दु:खातिरेकाने प्रदीप हा अप्पासाहेबांनी तिच्यावर केलेल्या बळजोरीतून झालेला मुलगा होता हे उघड केलेले धक्कादायक गुपित. प्रत्यक्षात विश्वासने अरुंधतीच्या साथीने प्रदीपच्या मरण्याचे रचलेले नाटक. शेवटी अप्पासाहेबांनी प्रेमाने प्रदीपचा स्वीकार करून वाकिली व सामाजिक जीवनातून घेतलेला संन्यास व प्रदीपचे जोशींच्या मुलीशी ठरलेले लग्न यासारख्या अनेक घटना वेगाने घडत नाटक उत्तरोत्तर चढत जाऊन यशाचा कळस गाठत सुखसमाधानाने संपते.

अप्पासाहेब मुजुमदारांची मध्यवर्ती व मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू दाखवणारी भूमिका नचिकेत सरदेसाई यांनी अत्यंत ताकदीने उभी केली आहे. आप्पासाहेबांमधले सगळेच भाव- जरब, संताप, स्वार्थ व पश्चात्ताप त्यांनी अतिशय प्रभावीपणे दाखविलेत. ही भूमिका नचिकेत सरदेसाई अक्षरशः जगलेत.

काकू-विश्वास-प्रदीप ही तीन पात्रही तितकीच महत्त्वाची. काकूची भूमिका सौ.गौरी करंदीकर यांनी अतिशय तडफदारपणे सादर केली आहे. आश्रित असल्याची जाणीव ठेवत वावरणारी काकू वेळप्रसंगी अप्पासाहेबांना दमात घेते. पमा, विश्वास व त्यांची आई यांच्याप्रती आदर व प्रदीपवरच्या प्रेमामुळे आलेली अगतिकता गौरी करंदीकरांनी समर्थपणे दाखविली आहे.

कुटुंबाप्रती आदर, प्रेम असलेल्या तत्त्वनिष्ठ डॉक्टर विश्वासची भूमिका राहुल शिंदे यांनी समर्थपणे साकारली आहे. अरुंधती बरोबरचे प्रेमाचे तरल प्रसंग, प्रदीपवरचे प्रेम व अप्पासाहेबांना दिलेली टक्कर राहुल शिंदेनी व्यवस्थित दाखवली आहे.

प्रदिपचे शारीरिक अपंगत्व व मतिमंदपणा चंद्रशेखर वझे यांनी अप्रतिम व्यक्त केला आहे. संपूर्ण नाटकभर हातापायचा वाकडेपणा व बोलतानाचे अडखळलेपण सांभाळलेच व त्याबरोबरच प्रदीपच्या मनातील आंदोलनेही तितकीच समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवली. ही अवघड भूमिका चंद्रशेखर वझे यांनी प्रभावीपणे सादर केली.

अरुंधती व कारकून जोशी या दोन्ही पूरक भूमिका. सौ. दिपा जोशींनी अरुंधतीची असहाय, दु:खी पण अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची तडफ दाखवणारी भूमिका छान सादर केली. कारकून जोशींच्या भूमिकेत आनंद धर्माधिकारी चपखल बसलेत. घरच्या ओढाताणीने व सात लेकींच्या ओझ्याने पिचलेला बाप यथायोग्य दाखवलाच व प्रसंगानुरुप नर्मविनोद मार्मिकरीत्या सादर करून प्रेक्षकांच्या मनावरचा ताण हलका केला.

आईच्या भूमिकेत सौ.मेधा कदम होत्या. प्रेमळ व दुखणेकरी आई त्यांनी चांगली उभी केली. पमाची भूमिका सौ. मेघा धर्माधिकारींनी यथोचित सादर केली. मामांची हजरजबाबी-खट परंतु भाच्यावरचे प्रेम दाखवणारी भूमिका अभिजित नेरूरकरांनी छान साकारली. भाच्याच्या भूमिकेत होते मयुरेश देशपांडे. लग्नाळू मुलाची चलबिचल व लग्न ठरल्यावरची सूचक नेत्रपल्लवी पर्फेक्ट सादर करून मयुरेश देशपांडेनी भाच्याच्या भूमिकेत रंग भरला. विशाल डहाळकरांनी रामराव अशिलाच्या भूमिकेतील चिडचिड, अगतिकता छान साकारून उत्तम साथ दिली.

कौटुंबिक-सामाजिक गंभीर बाजाच्या " ऋणानुबंध " नाटकाचे दिग्दर्शन गौतम करंदीकर यांनी अतिशय उत्कृष्ट्य रित्या करून एक अत्यंत दर्जेदार नाटक सादर केले. प्रत्येक भूमिकेचे नेमकेपण व निरनिराळ्या प्रसंगातील द्वंद्व गौतम करंदीकरांच्या निष्णात मार्गदर्शनाने अचूक उभे राहिले. आयटी क्षेत्राशी संबंधीत हौशी कलाकारांकडून मेहनत करून घेऊन एक अप्रतिम नाटक प्रभावीपणे मांडले. या नाटकाच्या तुफान यशामुळे गौतम करंदीकरांप्रती गावोगावच्या प्रेक्षकांच्या मनातील अपेक्षा अजूनच उंचावल्या.

मुजुमदारांच्या चिरेबंदी वाड्याचा सेट गिरीश कदम, दिनेश पटवर्धन व विनोद ठाकुर यांनी अप्रतिम उभा केला. वाड्यात जीना असणे ही या नाटकाची गरज होती व ती या टीमने फोल्डींग जीना बनवून पार पाडली. या सेटचे चिरेबंदी वाड्यात रुपांतर उत्तम नाईक व अनिकेत वैद्य यांनी केले. प्रकाशयोजना विशाल डहाळकर व उमेश अडगावकर यांची होती. या नाटकाला संगीत दिले होते अतुल देसाई यांनी. विशेष साहाय्य सौ.मेघना वझे यांचे होते.

ब्लूमिंग्टन-नॉर्मल मंडळाने प्रथमच तीन व्हिडिओ कॅमेरे लावून नाटकाचे व्हिडिओ चित्रण नचिकेत सरदेसाई यांच्या मार्गदर्शखाली सचिन अडबे, समीर जोगळेकर व शशीधर वेंकट यांनी केले. या थ्री कॅमेरा सेट अप ने केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचे संकलन नचिकेत सरदेसाई यांनी उत्कृष्ट्य रित्या करून डीव्हीडी बनवली.

या यशस्वी नाटकाचे प्रयोग सेंट लुईस येथे अत्यंत प्रभाविरीत्या सादर झाले व तिथल्या प्रेक्षकांनी हे दर्जेदार नाटक अक्षरश: डोक्यावर घेतले.

- भाग्यश्री सरदेसाई

नाटकाचे पोस्टर

कार्यक्रमाची छायाचित्रे